मोताळा 🙁 तालुका प्रतिनिधी )
चार आरोपी फरार; एकास ५ दिवसांची पोलीस कोठडी
तालुक्यातील लालमाती फाट्याजवळ जुन्या वादातून पान्हेरा येथील प्रदीप कुळे याने तेथील अनिल बावस्कर यांचा लोखंडी रॉडने खून केल्याची घटना १२ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली होती. खून केल्यानंतर मारेकरी प्रदीप कुळे हा धामणगाव बढे पोलिसांत हजर झाला होता. त्याला १३ मार्च रोजी न्यायालयाने ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनाविली.
तर इतर ४ आरोपी फरार झाले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील पान्हेरा खेडी येथील रहिवासी अनिल बावस्कर व प्रदीप कुळे यांच्यामध्ये जुना वाद होता. त्या वादातून प्रदीप गोविंदा कुळे (वय ४०) याने १२ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास लालमाती फाट्यवरील इंडियन ऑईल पंपासमोर अनिल प्रल्हाद बावस्कर (वय ४७) यांना लोखंडी रॉडने डोक्यावर, पाठीत बेदम मारहाण केली. या मारहाणीत अनिल बावस्कर यांचा मृत्यू झाला होता. खून केल्यानंतर प्रदीप कुळे याने धामणगाव बढे पोलीस स्टेशमध्ये जावून घटनेची माहिती दिली. ठाणेदार नागेश जायले हे आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल होवून घटनेचा पंचनामा केला.
घटनेची गांभीर्य पाहता अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी हे बुधवारी रात्री गुन्हा दाखल होईल पर्यंत हजर होते. याप्रकरणी मृतकाचा भाऊ सुनिल बावस्कर यांच्या फिर्यादीवरुन धा. बढे पोलिसांनी खून प्रकरणी प्रदीप गोविदा कुळे यांच्यासह विशाल राजेंद्र कुळे (वय ४१), अमर राजेंद्र कुळे (वय ४०), नंदा गोविदा कुळे (वय ५५), गोविदा कुळे (वय ६२) सर्व रा. पान्हेरा यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १९१(२), १९१(३), १०३ (१), ११५(२), १८९ (२), २८९ (४), १९० अन्वये गुन्हा दाखल केला. न्यायालयाने प्रदीप कुळे याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनाविली. मात्र या घटनेतील विशाल कुळे, अमर कुळे, नंदा कुळे, गोविदा कुळे हे फरार झाले असून त्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. याबाबत ठाणेदार नागेश जायले यांना विचारले असता त्यांनी पोलिस आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती पुण्यनगरीशी बोलताना दिली.
Users Today : 72