देऊळगाव राजा:-( तालुका प्रतिनिधी )
शहरात १९९७ पासून सतत जायंट्स परिवाराच्या वतीने होळी उत्सवानिमित्त दरवर्षी हास्य कविसंमेलनाचे आयोजन केले जाते. सदर परंपरा कायम ठेवत यावर्षीही १४ मार्च २०२५ रोजी मुंबईचे प्रसिद्ध कवी विसुभाऊ बापट यांचा ‘कुटुंब रंगलय काव्यात’ हा कार्यक्रम धोंडीराज महाराज मंदिराच्या शेजारील मैदानात पार पडला. या कार्यक्रमामुळे देऊळगावराजा परिसरातील रसिक मंत्रमुग्ध झाले होते. विसुभाऊ बापट यांनी आजवर १० हजाराहून अधिक कविता, २७०० पेक्षा जास्त काव्यप्रस्तुती, ७० पेक्षा जास्त काव्यविधा आणि १० हून अधिक मराठी बोली भाषांमध्ये आपली कला सादर केली आहे. त्यांची खासियत म्हणजे सलग ४५ तासांपर्यंत काव्यपाठ आणि सजीव सादरीकरण. या त्यांच्या विश्वविक्रमी एकल काव्य-नाट्य प्रस्तुती ‘कुटुंब रंगलय काव्यात’ च्या माध्यमातून त्यांनी आपली अनोखी कला सादर केली. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कविता, लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकासाठी वेगवेगळ्या शैलीत काव्यसादरीकरण केले. यात संस्कृती, कला, देशभक्ती आणि समाजप्रबोधनाचा संदेश देण्यात आला. यावेळी त्यांनी शहरी व ग्रामीण भागातील कौबिक व सामाजिक उदाहरणे देऊन त्यांनी प्रेक्षकांना महिला वर्गाला मंत्रमुग्ध केले. संचालन अशोक जोशी यांनी केले. याप्रसंगी बुलढाण्याचे बीजेएसचे अध्यक्ष राजेश देशलहरा व अॅड जितेंद्र कोठारी यांनी कवी विसूभाऊ बापट यांचा सत्कार केला. शहरातील रसिक प्रेक्षकांनी या कविसंमेलनाचा मनसोक्त आनंद घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष कल्याण चांडगे, सन्मती जैन, पुरुषोत्तम धन्नावत, जुगलकिशोर हरकूट, संजय डोणगावकर, मनिष काबरा, डॉ. अशोक काबरा आणि इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.
Users Today : 169