शेगाव:-( तालुका प्रतिनिधी )
भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संघ भावनेतून कार्य केल्यास राज्यात द्वितीय स्थानावर असलेली बुलढाणा (उत्तर) जिल्हाशाखा राज्यात अव्वल स्थान प्राप्त करेल, असा दृढ विश्वास समता सैनिक दलाचे लेफ्टनंट कर्नल व भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष (संरक्षण) के. एम. हेलोडे यांनी व्यक्त केला.
भारतीय बौद्ध महासभेच्या बुलढाणा जिल्हा शाखेच्या नवनियुक्त पदाधिकारी पहिली बैठक १७ मार्च रोजी पार पडली. त्यावेळी बैठकीला संबोधित करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पण व दीप प्रजलनाने झाली. त्यानंतर सामूहिक त्रिसरणासह पंचशील घेण्यात आले. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष के. के. शेगोकार यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक आम्रपाली नगर येथील बुद्ध विहारात ही बैठक पार पडली. यावेळी सर्वानुमते विविध ठराव संमत करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभेच्या महिला जिल्हाध्यक्ष छायाताई बांगर, सुरेश गव्हांदे, एस.एस.वले, डॉ. अनिल वानखडे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. नवनियुक्त कार्यकारणी सोबत जिल्हा हिशोब तपासणीस म्हणून नियुक्त झालेले तुकाराम रोकडे यांचा पत्रयोगी पुरस्कार मिळविल्याबद्दल संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन जिल्हा सचिव बी.एन. सुरवाडे, प्रास्ताविक कोषाध्यक्ष धम्मपाल वाघ व आभार कार्यालयीन सचिव डी.एन. खंडारे यांनी मानले. कार्यक्रमाला नवनियुक्त जिल्हा कार्यकारणी सोबतच जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदुरा, मोताळा, शेगाव, मलकापूर व खामगाव तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
Users Today : 169