डोणगाव:-तालुका प्रतिनिधी
ग्रामपंचायतीने मासिक सभेचे आयोजन केले. उपसरपंचांसह सदस्य जमले. पण, ग्रामपंचायत कार्यालय उघडण्याचा काही पत्ताच नव्हता. माध्यमांना ही बाब सांगताच सरपंचांसह ग्रामपंचायत अधिकारी हजर झाले. सभेला सुरुवात झाली, पण उपसरपंचांची खुर्चीच गायब झाली होती. बसायला जागाच नसल्याने उपसरपंचांनी चक्क टेबलवर बस्तान मांडले. विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीत मंगळवारी घडलेला प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.डोणगाव येथून जवळच असलेल्या विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीत १८ मार्चला सकाळी मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. ११ वाजूनही ग्रामपंचायत न उघडल्याने उपसरपंच रमेश खोडके यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामपंचायत कार्यालयासमोर बसावे लागले. याची माहिती उपसरपंचांनी माध्यमांना देताच साडेअकरा वाजता ग्रामपंचायत अधिकारी भगवान काळे व सरपंच उपस्थित झाले. त्यानंतर मासिक सभेला सुरुवात झाली. पण, मासिक सभेत उपसरपंचांची खुर्ची गायब झाल्याने त्यांना चक्क टेबलवर बसावे लागले. तर कुणाचे म्हणणे न ऐकताच मासिक सभा गुंडाळण्यात आली. या अगोदरही सरपंच, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा गावकऱ्यांना कटू अनुभव आला. एका ग्रामस्थाच्या नमुना आठ ‘अ’वर खाडाखोड करण्यात आली होती. याबाबत तक्रार करताच दुरुस्ती करण्यात आली. मनमानी करणाऱ्या अधिकारी, सरपंचाविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी उपसरपंच रमेश खोडके व ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.
Users Today : 181