देऊळगाव घुबे:-विशेष प्रतिनिधी
खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणी वापर संस्थेच्या लाभक्षेत्रातील अपूर्ण कामे, त्यावरील उपाययोजना व सदर बाबतीत उद्भवणाऱ्या अडीअडचणींबाबत पाणी वापर संस्थांच्या प्रतिनिधींसोबत खडकपूर्णा प्रकल्प अधिकाऱ्यांसह पाटबंधारे प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. मे २०२५ पर्यंत प्रकल्पस्तरावरील अधिकार कक्षेतील कामे पूर्ण करण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात येतील, तसेच कामे पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने शासनाकडे सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवून कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन याप्रसंगी अधीक्षक अभियंता बापूसाहेब गाढे यांच्या समक्ष खडकपूर्णाचे कार्यकारी अभियंता अमोल चोपडे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत, खडकपूर्णाचे उपविभागीय अधिकारी जाधव यांनी पाणी वापर संस्थांच्या प्रतिनिधींना दिले.
खडकपूर्णा प्रकल्पाचे उपसा जलसिंचन योजना टप्पा क्रमांक १ ते ४ वरील पाणी वापर संस्थांच्या प्रतिनिधींनी वसुंधरा पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष शेणफडराव घुबे व बळीराजा, जिजामाता, जय सेवालाल पाणी वापर संस्था व छत्रपती शिवाजी महाराज पाणी वापर संस्थेचे समन्यवक संचालक एकनाथ पाटील थुट्टे यांच्या नेतृत्वाखाली मलगी, रोहडा, कोलारा, अमोना, कोनड-येवता देऊळगाव धनगर या पाणी वापर संस्थांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या पाणी वापर संस्थांच्या लाभक्षेत्रातील अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने व शेतकऱ्यांच्या सिंचना संबंधीच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी खडकपूर्णा प्रकल्पाचे अधिकारी व पाणी वापर संस्थांच्या प्रतिनिधींची समन्वय सभा घेण्याबाबत मागणी केल्यावरून जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार १७ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता गाढे यांच्या कार्यालयात समन्वय सभा झाली. या सभेमध्ये शेणफडराव घुबे, एकनाथ थुट्टे, राजू थुट्टे, अच्युतराव पाटील थुट्टे, विश्वनाथ सोळंकी, दिनकरराव घुबे, राजू जावळे, डॉ. विकास मिसाळ, पंजाबराव जावळे यांनी सहभाग घेतला. वसुंधरा पाणी वापर संस्था देऊळगाव घुबे, बळीराजा पाणी वापर संस्था भरोसा देऊळगाव घुबे, जय सेवालाल पाणी वापर संस्था भरोसा अंचरवाडी, छत्रपती शिवाजी महाराज पाणी वापर संस्था भरोसा, रामनगर देऊळगाव घुबे, खंडोबा पाणी वापर संस्था देऊळगाव घुबे, कोनड व सिद्धेश्वर पाणी वापर संस्थेच्या लाभ क्षेत्रातील अपूर्ण कामे, त्यावरील उपाययोजना व सदर बाबतीत उद्भवणाऱ्या अडीअडचणी यावर सखोल चर्चा करून मे २०२५ पर्यंत प्रकल्प स्तरावरील अधिकार कक्षेतील कामे पूर्ण करण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात येतील व काही महत्त्वाची व अत्यावश्यक कामाची नोंद घेऊन कामे पूर्णत्वास नेण्यासाठी शासनाकडे सुधारित प्रशासकीय मान्यतेकरिता पाठवून कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन खडकपूर्णा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अमोल चोपडे, लघू पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत, खडकपूर्णाचे उपविभागीय अधिकारी जाधव यांनी पाणी वापर संस्थांच्या प्रतिनिधींना दिले.
Users Today : 209