देऊळगाव राजा :-तालुका प्रतिनिधी
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’मध्ये राज्यात बुलढाणा जिल्हा अव्वल आणण्यासाठी काम करा. तसेच संस्थेला येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी यंत्रणा प्रमुखांनी सहकार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले.संपूर्ण राज्यात ‘गाळमुक्त धरण गाळ युक्त शिवार’ योजनेअंतर्गत विविध लहान-मोठ्या धरणातील गाळ काढण्याच्या कामास युद्ध पातळीवर सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, खेडे, तांडे, वाड्या पाणीटंचाईमुक्त व्हाव्यात, अशी अपेक्षा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. पुढील पाच वर्षांसाठी राज्यातील विविध धरणातील गाळ काढण्यासाठी अर्थसंकल्पात फार मोठी तरतूद करून ठेवली आहे. गाळ काढण्याचे काम सतत सुरू राहणार आहे. याबाबत शासनाने ऑक्टोबर २०२४ मध्येच निर्णय घेतला आहे. शासन निर्णयानुसार बुलढाणा जिल्ह्यात १०९ धरणातील गाळ काढण्याच्या कामाच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिली असून, कामाला सुरुवातही झाली आहे. गाळ काढण्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या दालनात १८ मार्च २०२५ रोजी संयुक्तिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना त्यांनी सांगितले की, गाळमुक्त धरण गाळ युक्त शिवार योजनेमध्ये आपला बुलढाणा जिल्हा राज्यात अव्वल यावला हवा. राज्यात सर्वात जास्त काम आपल्या जिल्ह्यात आपल्याला करायचे आहे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.ज्या ज्या खासगी संस्थेला गाळ काढण्याचे आदेश मृद व जलसंधारण विभागाकडून देण्यात आले आहे, त्या सर्व संस्थांनी तत्काळ कामात सुरुवात करावी. १ एप्रिलपर्यंत गाळ काढण्याच्या कामास सुरुवात न झाल्यास त्या संस्थेला दिलेले आदेश रद्द करून इतर संस्थेला ते काम करण्याचे आदेश देण्यात येईल. याचबरोबर ज्या ज्या संस्थेला ज्या काही तांत्रिक अडचणी येत आहेत त्या संबंधित यंत्रणा प्रमुखांनी सोडविण्यासाठी प्रयत्न करावे. वनविभागाने त्यांच्या जमिनीमध्ये जे काही छोटे मोठे कट्टे असतील त्यातील गाळ काढून त्याच परिसरात टाकावा व त्या कट्ट्याची सिंचन क्षमता वाढवावी. मुक्या जनावरांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार कामाचा आढावा घेण्यासाठी महिन्यातून दोन वेळेस आढावा बैठक घ्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या.बीजेएसने याचा प्रचार, प्रसार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कृषी विभागाने त्यांच्या सिमेंट बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी प्रस्ताव सादर करून त्यास प्रशासकीय मानता घेण्याचे सुचविण्यात आले. बैठकीमध्ये संबंधित यंत्रणाप्रमुख, पदाधिकारी एनजीओचे पदाधिकारी व विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Users Today : 209