डोणगाव:-तालुका प्रतिनिधी
मुंबई-नागपूर राज्य महामार्गावर वसलेल्या डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेल्या काही महिन्यांपासून रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड सुरु आहे. रुग्ण सकाळी आरोग्य केंद्रात उपचारासाठी जातात. मात्र, वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने त्यांना उपचाराविना परतावे लागते तर कधी दोन-तीन वाजतापर्यंत आरोग्य केंद्रातच ताटकळत बसावे लागत आहे. या ठिकाणी कार्यरत असलेले महाभाग वैद्यकीस अधिकारी सकाळची ओपीडी भर दुपारी दोन वाजता घेत आहेत. त्यामुळे रुग्णांचे हाल होत असून त्यांना खाजगी रुग्णालयांचा रस्ता धरावा लागत आहे. परिणामी आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे.डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत ३५ गाव येतात. गोहगाव,आरेगाव, शेलगाव, अंजनी बुद्रूक, लोणी गवळी, आधृड, विश्वि, पांगरखेड, डोणगाव तालुका उपकेंद्राला जोडलेले आहे. ७० हजार लोकसंख्येच्या दृष्टीने या ठिकाणी शासनाने ५ समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी गट ब ३, एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी ३, ६ आरोग्य सेविका, ३ कंत्राटी आरोग्य सेविका, ८ आरोग्य सेवक, तीन पर्यवेक्षक दिलेले आहेत. असे असतांनाही येथील आरोग्यसेवा वाऱ्यावरच असल्याचे दिसून येते. प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत २४ तास आरोग्यसेवा मिळणे आवश्यक असून रुग्ण तपासणीची वेळ सकाळी ८ ते १२ आणि दुपारी ४ ते ५ आहे. मात्र, डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ही रुग्ण तपासणी सकाळी वेळवर होत नसून रुग्णांना दुपारची वेळ सांगितली जाते. त्यामुळे उपचार करुन कामावर जाणाऱ्या गोरगरीब मजूरांना कामधंदे सोडून वैद्यकीय अधिकारी येण्याची वाट बघावी लागते. नाही, तर पैसे खर्च करुन खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागते. त्यामुळे त्याची हेळसांड तर होतेच शिवाय आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत असल्याचे चित्र आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन वैद्यकीय अधिकारी, तीन पर्यवेक्षक असल्यानंतरही रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. तेव्हा या आरोग्य केंद्रातंर्गत येणाऱ्या ९ उपकेंद्राची अवस्था काय असेल?, याची कल्पना न केलेली बरी. त्यामुळे वरिष्ठांकडून आरोग्य केंद्रासह उपकेंद्राची तपासणी होणे गरजेचे आहे. सोबतच कामचुकारपणा करुन रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
Users Today : 209