बाळापूर:-तालुका प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती सोमवार दि.१७ मार्च २०२५ रोजी सायंकाळी बाळापूर शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्याच प्रमाणे बाळापूर शहर शिवसेना (उबाठा) गटाच्या वतीने बाळापूर शहरातून डीजे ढोलताशांसह टाळ मृदूंगच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंती निमित्त बाळापूर शहर शिवसेना (उबाठा) गटाच्या वतीने सकाळी श्री. सिद्ध तपे हनुमान मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून सायंकाळी पोस्ट ऑफिस बाळापुर येथून ढोलताशासह टाळ मृदूंगच्या गजरात अश्वमेध रथात शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवून आणि सोबत विशाल ठाकूर या युवा शिवप्रेमीने छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान करून अश्वावर बसून शहरातून मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली आणि हि मिरवणूक मुख्य बाजार पेठ, शाही मज्जीद चौक, जुनी चावडी, जैन मंदिर चौक, स्टेट बँक रोडने पुन्हा मुख्य बाजार पेठेतून पोस्ट ऑफिस पर्यंत काढण्यात आली. तर जैन मंदिराजवळ भारतीय विद्यार्थी परिषद बाळापूर नगरच्या वतीने शरबतचे वाटप करण्यात आले. मिरवणुकी दरम्यान शिवरायांच्या जयघोषने परिसर दणानूण सोडला तर चिंचोली ता. शेगावं येथील टाळ मृदूंग टाळकऱ्यांनी टाळ वाजवून भक्तीमय वातावरण निर्माण केले होते. शिवजयंती सोबतच मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना देखील सुरु आहे. दरम्यान काही शिवप्रेमी मुस्लिम बांधव देखील मिरवणुकीत सहभागी झाल्याने मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम एकता पहावयास मिळाली. शिवसैनिकांनी देखील मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना सुरु असल्यामुळे त्यांच्या भावना राखत शांततेत शहरातून मिरवणूक काढली. यावेळी शेकडो शिवसैनिकांनी सहभाग घेतला तर पोलिसांनीही मिरवणुकी दरम्यान चोख बंदोबस्त बजावला.
Users Today : 219