चिखलीत शेतकरी पुत्रांचे आंदोलन; शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवस उपवास !

Khozmaster
2 Min Read

चिखली:-तालुका प्रतिनिधी 

राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी सहवेदना दिनानिमित्त चिखलीतील शेतकरी पुत्रांनी एक दिवसाचा उपवास करून आंदोलन केले.राज्यभर १९ मार्च रोजी शेतकरी सहवेदना दिवस पाळला जातो. या निमित्ताने चिखलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन पक्षविरहित आणि सामाजिक स्वरूपाचे होते. विविध पक्षांतील शेतकरी पुत्रांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. या आंदोलनादरम्यान उपस्थितांनी शेतकऱ्यांच्या समस्या, आत्महत्या आणि कृषी धोरणांबाबत आपले विचार मांडले. भविष्यात संयुक्त लढ्याचे नियोजन करण्यासाठी बैठक घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला, तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताच्या गायनाने आंदोलनाची सांगता झाली. १९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथे शेतकरी साहेबराव पाटील करपे यांनी कुटुंबासह आत्महत्या केली होती. ही राज्यातील पहिली अधिकृत शेतकरी आत्महत्या म्हणून नोंदवली गेली. या घटनेला ३९ वर्षे पूर्ण झाली असली, तरीही शेतकरी आत्महत्यांचे सत्र अद्याप थांबलेले नाही. नुकतीच शिवणी आरमाळ (ता. देऊळगाव राजा) येथील राज्य पुरस्कारप्राप्त युवा शेतकरी कैलास नागरे यांनी आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने हाताळाव्यात, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. दरवर्षी या स्वरूपाचे आंदोलन येथे आयोजित केले जाते.एक दिवस उपवास करून प्रश्न सुटणार नाहीत. राजकीय पक्षांच्या संकल्पनांच्या पलीकडे जाऊन शेतकरी संघटनांनी एकत्रित लढा उभारला पाहिजे. शेतकरी चळवळीला पूर्वीसारखी तीव्रता आणि प्रभाव आणण्याची आवश्यकता आहे, असा ठाम आवाज या आंदोलनातून उमटला. शेतकरी कैलास नागरे यांनी दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाला अधिक धार आली होती.

0 9 5 2 7 1
Users Today : 219
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *