चिखली:-तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील शेळगाव आटोळ येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तब्बल वर्षभर बंद होती, त्यामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. अखेर आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन जागे झाले आणि गावाचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला.शेळगाव आटोळच्या पाणीपुरवठा योजनेत सुधारणा करून त्वरित पुनरारंभ करण्याच्या मागणीसाठी डॉ. विकास मिसाळ, सरपंच संतोष बोर्डे आणि ग्रामपंचायत सदस्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाल करत १८ मार्च रोजी पाणीपुरवठा सुरळीत केला. गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी माजी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी तीन वर्षापूर्वी ४.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीतून धरणात दोन इंटेक वेलची निर्मिती, जॅक वेलचे खोलीकरण, नवीन पाइपलाइन टाकणे आणि नवीन पाण्याची टाकी बांधणे यांसारखी महत्त्वाची कामे प्रस्तावित होती. मात्र, अद्याप ही कामे पूर्ण झालेली नाहीत. वर्षभराचा त्रास, अखेर दिलासा संबंधित विभागाकडून जुन्या पाइपलाइनद्वारेही पाणीपुरवठा शक्य असताना तो बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे ग्रामस्थांना वर्षभर मोठा त्रास सहन करावा लागला. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ, प्रभारी सरपंच संतोष बोर्डे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष सतीश भुतेकर आणि ग्रामपंचायत सदस्य बाजीराव देशमुख, कैलास बोर्डे, मुक्ता अनिल देशमुख, वनिता विकास मिसाळ, आशा शरद बोर्डे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाला जाग आली. आंदोलनाच्या दिवशीच पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला, त्यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला. मागणी पूर्ण झाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
Users Today : 219