चिखली:-तालुका प्रतिनिधी
जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने १८ मार्च २०२५ रोजी बुलढाणा येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करीत धरणे आंदोलन केले. दुपारी ३ ते ५ या वेळेत झालेल्या या आंदोलनात शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.या आंदोलनात राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी, १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयातील संच मान्यतेबाबतच्या जाचक अटी रद्द कराव्यात, राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना १०, २० व ३० वर्षांची आश्वासित प्रगती योजना लागू करावी, शिक्षकांसाठी वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीचे प्रशिक्षण आयोजित करावे, शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करावे, रिक्त असलेली माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची पदे तत्काळ भरावीत, वरिष्ठ श्रेणी मंजूरीचे अधिकार पूर्वीप्रमाणे लेखाधिकाऱ्यांना द्यावेत, निवड श्रेणीतील २० टक्के अट रद्द करून सर्वांना निवड श्रेणी द्यावी, प्रलंबित वैद्यकीय देयके तत्काळ मंजूर करावीत, नगर परिषद अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वैद्यकीय सुविधा लागू कराव्यात, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे निवृत्त वय केंद्राप्रमाणे ६० वर्षे करावे, यासारख्या अनेक मागण्यांचा समावेश असलेल्या निवेदनाचे वाचन करून ते शिक्षणाधिकारी अनिल आकाळ यांना देण्यात आले. या आंदोलनात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विष्णु अवचार, जिल्हा कार्यवाह सतीश शेळके, जिल्हा कार्याध्यक्ष रामदास गुरव, अखिल तांबोळी, जिल्हा उपाध्यक्ष संजाब तेजनकर, दीपक दराडे, सचिन पाटील, जिल्हा सहकार्यवाह गजानन हिवरकर, रवींद्र देवरे, कोषाध्यक्ष जनाबापू मेहेत्रे, पी. व्ही. सुरगडे, मिलिंद चौधरी, नरेंद्र खर्चे, प्रवीण कोलते, एम. ए. गुप्ता, प्रताप ठोकळ, बी. ऊ. सरदार, विवेक निकष, डी. टी. डोळे, राम किसान चिते, अशोक तायडे यांच्यासह अनेक शिक्षक सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान शिक्षकांनी आपल्या समस्यांबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या. शासनाने या मागण्यांची तत्काळ दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
Users Today : 16