सिंचनाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको मुंबई-नागपूर महामार्गावर तीन तास आंदोलन : कैलास नागरेंच्या कुटुंबीयांना २५ लाखांचे अर्थसाह्य द्या

Khozmaster
2 Min Read

अंढेरा:-विशेष प्रतिनिधी 

शेतकऱ्यांना सिंचनाकरिता खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी द्यावे, यासाठी विष प्राशन करून बलिदान देणारे आदर्श शेतकरी कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांना २५ लाखांचे अर्थसाह्य करावे, सिंचनाचा प्रश्न मार्गी लावावा आणि दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे या मागण्यांकरिता २० मार्चला शेतकऱ्यांनी अंढेरा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करून मुंबई नागपूर महामार्ग तब्बल तीन तास रोखून धरला. शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन छेडण्यात आले.शेकडो शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी शासनाचे लक्ष वेधत आंदोलन करणारे शासनाचा युवा पुरस्कारप्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवणी आरमाळ येथील नागरे कुटुंबीयांची प्रकाश पोहरे यांनी सांत्वनपर भेट घेतली. एका शेतकऱ्याला आपले बलिदान देण्याची वेळ शासन, प्रशासनाने आणल्याने संतप्त झालेल्या पोहरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी मुंबई ते नागपूर महामार्गावर अंढेरा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. रस्त्याच्या दुतर्फा तीन तास वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.पोलीस अधिकारी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी फोनवर संपर्क केला. मात्र, आंदोलनस्थळी येऊन आश्वासन द्यावे, तरच आंदोलन मागे घेऊ, असा पवित्रा घेण्यात आला. दरम्यान, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ आंदोलनस्थळी दाखल झाल्या. त्यांनी आतापर्यंत सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती देत, रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. सामाजिक कार्यकर्ते अॅड. अविनाश काळे यांनी संविधानात्मक कायदेशीर मुद्यांना घेऊन या प्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरले.
तहसीलदार डोंगरजाळ यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रश्नी उद्या जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी बैठक बोलाविली आहे.
या आंदोलनात शिवसेना (उबाठा) चे तालुकाप्रमुख दादाराव खारडे, भगवान मुंडे, भगवान नागरे, खंडू मांटे यांच्यासह परिसरातील शेतकरी सहभागी णाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी भगत, ठाणेदार रूपेश शक्करगे, तथा दंगा काबू पथक यांच्यासह मोठा फौजफाटा तैनात होता.

0 9 5 2 9 0
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *