बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
मुंबई, पुण्यात न जाण्याच्या अटीवर रविकांत तुपकरांची रायगड पोलिसांनी सुटका केली. तुपकरांना घेऊन पोलीस बुलढाण्यात दाखल झाले.रविकांत तुपकर यांनी घोषित केलेले कर्जमुक्ती आंदोलन राज्यात चांगलेच गाजले. अरबी समुद्रात सातबारे बुडवून व सोयाबीन फेकून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न रविकांत तुपकर व शेतकरी करणार होते. मात्र पोलिसांनी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख शिलेदारांना पोलिसांनी तब्बल दोन दिवस ताब्यात ठेवले. रविकांत तुपकर यांच्याही अटकेचे प्रयत्न झाले. मात्र भूमिगत होऊन तुपकर थेट मुंबईच्या वेशीवरच प्रगटले. अखेर काल मुंबईच्या वेशीवर रविकांत तुपकर व शेतकऱ्यांचा पोलिसांची संघर्ष उडाला. पोलिसांनी बळाचा वापर करीत रविकांत तुपकर व अॅड. शर्वरी तुपकर यांना अटक केली. शेतकऱ्यांना मुक्कामाच्या ठिकाणीच कोंडले. दिवसभराच्या या राड्यानंतर रायगड पोलिसांनी रात्री उशिरा तुपकर यांची सुटका केली. मात्र सुटका करताना मुंबई किंवा पुण्यात न जाता थेट बुलढाण्यात जावे, अशी अट पोलिसांनी घातली. एवढेच नव्हे तर पोलिसांचा मोठा फौजफाटा देऊन पोलीस तुपकरांना घेऊन बुलढाण्याकडे निघाले. रात्रभराच्या प्रवासात रविकांत तुपकरांसाठी प्रत्येक पोलीस स्टेशन हाय अलर्ट मोडवर होते. पोलिसांची नजर चुकवून रविकांत तुपकर गायब होऊ नये म्हणून तुपकरांच्या वाहनाच्या मागेपुढे पोलिसांच्या गाड्या होत्या. मार्गातही ठिकठिकाणी त्या, त्या ठिकाणच्या पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.
Users Today : 16