सैलानी:-विशेष प्रतिनिधी
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हाजी अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांचा संदल १९ मार्च रोजी रात्री बारा वाजता बाबांच्या समाधीवर (दर्गा) मोठ्या भक्तिभावात चढविण्यात आला. यावेळी देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी संदलचे दर्शन घेतले. रात्री नऊ वाजता पिंपळगाव सराई येथील संदल घरातून सजविलेल्या उंटणीवरून संदल मिरवणूक निघाली.पिंपळगाव सराई येथील संदल घरामध्ये शेख शफीक मुजावर, चाँद मुजावर, अस्लम मुजावर, नईम मुजावर व रशीद मुजावर यांच्या हस्ते कुराण पोथी पठण करून विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. चंदन लेप, गलेफ, चादर असलेला संदल एका कटोरीत गुंडाळून उंटणीवर ठेवण्यात आला. नगारे, ढोलताशांचा निनाद आणि फटाक्यांच्या आतषबाजीत संदल मिरवणूक काढण्यात आली. संदलच्या स्वागतासाठी महिलांनी पिंपळगाव सराईत घरांच्या समोर सडासर्माजन करून आकर्षक रांगोळीकाढल्या होत्या. गावकऱ्यांनी फुलांचा वर्षाव करून स्वागत केले. उंटीण व संदलचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी एकच गर्दी केली होती. डोंगरातून पांदण रस्त्याने सैलानी बाबांच्या दग्र्त्यांवर रात्री बारा वाजता संदल पोहोचला. रायपूरचे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी संदल डोक्यावर घेत नंतर दर्याच्या पायरीवर ठेऊन दर्शन घेतले. सैलानी बाबांच्या समाधीला रफीक मुजावर, हाशम मुजावर, शफीक मुजावर, रशीद मुजावर, शेख चाँद मुजावर, जहीर मुजावर, नईम मुजावर, असलम मुजावर यांनी सैलानी बाबांच्या समाधीला चंदन लेपाचा संदल लावून दर्यावर संदल चादर चढविली. यावेळी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Users Today : 16