जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसानभरपाई मिळण्यास विलंब का ? आ. सईताई डहाकेंचा अधिवेशनात प्रश्न : दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

Khozmaster
2 Min Read

कारंजा:-तालुका प्रतिनिधी

वाशीम जिल्ह्यात ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. याची भरपाई अद्यापही त्यांना मिळाली नसून प्रदीर्घ विलंब का ? याला जबाबदार संबंधीत अधिकारी व विमा कंपनीवर कारवाई करणार का? असा प्रश्न कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीमती सईताई डहाके यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला.२०मार्च रोजी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार श्रीमती सईताई डहाके यांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित करून वाशीम जिल्ह्यात ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीचा अहवाल संबंधित विभागाने शासनाकडे सादर केला. त्या अनुषंगाने ७३ कोटी ८८ लाख ५५ हजार ५८८ रुपये शासनाने मंजूर केले आहे. हा देय निधी मार्च २०२५ पर्यंत शेतकऱ्यांना दिल्या जाईल, असे संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी आश्वासित केले असले तरी, याला दीड वर्ष विलंब लावल्याबद्दल शेतकऱ्यांना यांचे व्याज किंवा भरीव मदत दिल्या जाणार का? असा प्रश्न उपस्थित करीत यामध्ये दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का? तसेच शेतकऱ्यांना वारंवार त्रास देणाऱ्या विमा कंपनीच्या बेजबाबदार कर्मचाऱ्यांची चौकशी करणार का? असा प्रश्न उपस्थित केला. यावर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी वाशीम जिल्ह्यात ऑगस्ट सप्टेंबर २०२४ या खरीप हंगामात ६५ हजार ४८४ शेतकऱ्यांची ५३ हजार ८३५ हेक्टर शेती अतिवृष्टीमुळे बाधित झाली होती. त्यानुसार शासन निर्णय १८ मार्च २०२५ अन्वये देय निधी मंजूर करण्यात आला असल्याचे सांगितले. आमदार श्रीमती सईताई डहाके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे वाशीम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आपल्या पहिल्याच अधिवेशनात आ. डहाके यांनी जगाच्या पोशिंद्याला न्याय मिळाला पाहिजे याकरिता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी या हेतूने लक्षवेधीचे आयुध वापरले याबद्दल शेतकऱ्यांतून कौतुक होत आहे.

0 9 5 2 9 1
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *