मंगरुळपीर:-तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील आदर्श गाव वनोजा येथे नेटाफेम इरिगेशन इंडिया प्रा.ली आणि राऊत वनोजा फार्मर प्रोडूसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने १६ मार्च रोजी साळुंकबाई राऊत महाविद्यालयात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत इस्रायल येथील शाश्वत पीक उत्पादन विशेष तज्ञ झिव चॅरिट यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.कार्यशाळेच्या सुरुवातीला शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीत वनोजा येथील काही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या बागांना भेटी देण्यात आल्या. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या संत्रा शेतीतील बारकावे उपस्थितांना समजावून सांगितले. तसेच, वार्षिक नियोजन, खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती दिली. झिव चॅरिट यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना योग्य मार्गदर्शन केले. यानंतर, साळुंकबाई राऊत महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात झिव चॅरिट यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती व पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व आणि त्याचा उत्पादनावर होणारा परिणाम, हवामानातील बदलांना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. इस्त्रायलमध्ये शेतकरी याच पद्धतीने शेती करतात आणि चांगले उत्पादन घेतात, असे त्यांनी नमूद केले. यांनातर वनोजा येथील ज्येष्ठ शेतकरी विष्णुपंत राऊत यांनी आपल्या संत्रा शेतीतील अनुभवांबद्दल माहिती दिली. कार्यशाळेला जिल्ह्यातील अनेक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली उपस्थिती दर्शवली.
Users Today : 17