जलजीवन मिशनमध्ये दिरंगाई: दोषींवर निलंबनाची टांगती तलवार!

Khozmaster
2 Min Read

चिखली:-तालुका प्रतिनिधी 

मुंबई येथे झालेल्या जलजीवन मिशन आढावा बैठकीत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी बुलढाणा जिल्ह्यातील अपूर्ण कामांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. अपयशी ठरणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा आणि जबाबदारी झटकणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचा इशारा त्यांनी दिला. आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.आ. श्वेता महाले यांनी आपल्या मतदारसंघातील पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी जलजीवन मिशनअंतर्गत मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या आहेत. मात्र, संबंधित यंत्रणा आणि कंत्राटदारांच्या दिरंगाईमुळे अनेक कामे अपूर्ण राहिली आहेत. परिणामी, उन्हाळ्याच्या तडाख्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, २० मार्च रोजी मुंबईत त्यांच्याच पुढाकारातून ही बैठक घेण्यात आली. या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव, जलजीवन मिशनचे अभियान संचालक, स्वच्छ भारत मिशनचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व अन्य अधिकारी उपस्थित होते.कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश बैठकीत जलजीवन मिशनअंतर्गत गावनिहाय पाणीपुरवठा योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कामकाजात चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांना तातडीने सुधारणा करण्याचा आदेश देण्यात आला. तसेच, कामांमध्ये गुणवत्तेची तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अन्यथा दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन व कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे स्पष्ट संकेत दिले.

0 9 5 2 9 1
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *