पिंपळगाव सराई:-तालुका प्रतिनिधी
भाविकांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेला सैलानी बाबांचा उंटावरील संदल १९ मार्च रोजी रात्री मोठ्या भक्तिभावाने सैलानी बाबांच्या दर्यावर चढविण्यात आला. या प्रसंगी हजारो भाविक उपस्थित होते.पिंपळगाव सराई येथील संदल घरासमोरून पारंपरिक धार्मिक विधींसह मिरवणूक निघाली. उंटाला आकर्षक सजावट करण्यात आली होती. यानंतर, शेख शफिक मुजावर, चांद मुजावर, अस्लम मुजावर, नईम मुजावर, रशीद मुजावर यांच्या हस्ते कुराण पठण व पारंपरिक धार्मिक विधी पार पडले. यावेळी, कठोऱ्यात चंदन लेप ठेवण्यात आला, आणि हा कठोरा शेख शफिक मुजावर यांनी डोक्यावर घेतला. गलब चादर उंटावर ठेवून रात्री ९ वाजता संदल दर्याकडे मार्गस्थ झाला.
संदल मिरवणुकीदरम्यान पिंपळगाव सराई गावातून फिरून जुन्या पांधी मार्गे सैलानीकडे प्रस्थान करण्यात आले. भाविकांनी फुलांचा वर्षाव आणि फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला. ढोल-ताशांच्या गजरात वातावरण भक्तिमय झाले.मध्यरात्री १२ वाजता रायपूरचे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी संदलचा कठोरा डोक्यावर घेत दर्याच्या पायरीवर ठेवून दर्शन घेतले. त्यानंतर रफिक मुजावर, हाशम मुजावर, शफिक मुजावर, रशीद मुजावर, शेख चांद मुजावर, जहीर मुजावर, नईम मुजावर, असलम मुजावर यांनी संदल चढवला.
Users Today : 17