शेगाव:-तालुका प्रतिनिधी
जिल्ह्यातील शेगाव शहरातील एमएसईबी चौक ते आळसना गाव या रस्त्याच्या बांधकामाला वर्षभरापूर्वी सुरुवात झाली. मात्र, अद्यापपर्यंत काम न झालयाने रस्त्याची चाळणी झालेली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून रस्त्याचे काम तत्काळ सुरू व्हावे, यासाठी गुरुवारी माजी नगरसेवक दिनेश शिंदे यांच्या नेतृत्वात आळसना येथील गावकरी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका कार्यालयावर धडकले होते.वर्षभरापूर्वी उद्घाटन होऊन शेगाव-आळसणा रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली, कंत्राटदाराने रस्त्याचे दोन्ही बाजू खोदूनही टाकले व काम बंद पाडले. आता वर्षभराचा कालावधी उलटल्यानंतरही काम होत नसल्याने आणि या रस्त्यावर वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने दिवसेंदिवस अपघात वाढत आहेत. त्यामुळे आळसना गावकरी, या रस्त्यावर राहणारे नागरिकांनी माजी नगरसेवक दिनेश शिंदे यांच्या नेतृत्वात गुरुवारी शेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. या ठिकाणी नगरपालिकेच्या पत्रामुळे काम थांबले असल्याचे सांगितल्याने संतप्त नागरिक मुख्याधिकारी जयश्री काटकर यांच्या भेटीसाठी पालिकेत पोहोचले. यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तत्काळ पत्र देण्याचे कबूल केल्यानंतर नागरिक शांत झाले. आता सार्वजनिक बांधकाम विभागाला सोमवार पर्यंत काम सुरू करण्याची मुदत देण्यात आली आहे. सदर रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास मंगळवारी या रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक दिनेश शिंदे यांच्यासह गावकऱ्यांनी दिला आहे. यावेळी आमिर खा, संदीप पहुरकर, गजानन सुलताने, दिपंकर पहुरकर, श्रीकृष्ण लांजुरकर, संतोष सुलताने, भूरान बेग यांच्यासह आळसना गावातील नागरिक उपस्थित होते.कंत्राटदाराचा हलगर्जीपणा सदर रस्त्याच्या कंत्राटदाराने शेगाव-आळसना रस्त्याच्या दोन्ही बाजू घाईघाईत खोदून टाकल्या. त्यानंतर अचानकपणे काम बंद पाडले. काम बंद पडण्याचे कारण तांत्रिक असले तरी कंत्राटदाराने खोदून ठेवलेले खड्डे बुजले नसल्याने या भागातील अनेक नागरिकांचे अपघात होत आहेत. कंत्राटदाराने जैसे थे रस्ता करून दिला नसल्याने अपघातामुळे दोघांचा बळी सुद्धा केलेला आहे. याला कंत्राटदाराचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा सूर गावकऱ्यांमधून निघत आहे.
Users Today : 18