बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
पुनर्विवाहाला अनेक सामाजिक घटकांमध्ये आजही मान्यता नाही. त्यातही विधवांचा पुनर्विवाह म्हटला तर त्याकडे फारसे सकारात्मक पाहिल्या जात नाही. महिलेला एखादे मुल असले की तिचा संसार झाला असे म्हटले जाते. सामाजिक दडपणाखाली अनेक महिला इच्छा असूनसुद्धा पुनर्विवाहाबद्दल बोलत नाहीत. मात्र पुनर्विवाहाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी प्रा. डी.एस. लहाने यांनी धाडसी पाऊल उचलले असून एकल महिलांना मुलाबाळांसकट स्वीकारा. त्यांच्यापेक्षा त्यांच्या मुलांवर अधिक प्रेम करा, हा संदेश देत पुनर्विवाहाची चळवळ सुरू केली आहे. यंदाही त्यांनी विधवा व एकल महिलांच्या सामूहिक पुनर्विवाह सोहळ्याचे आयोजन बुलढाणा येथे केले आहे.
मानस फाउंडेशनच्या माध्यमातून बुलढाण्यात विधवांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. विधवा परिषदा, विधवा विवाह सोहळे आयोजित करून विधवा विवाहाला सामाजिक मान्यता देण्याचा प्रयत्न माणस फाउंडेशनकडून सतत होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून १२ एप्रिल रोजी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ते बुलढाणा येथे विधवा व एकल महिलांचा सामूहिक पुनर्विवाह सोहळा आयोजित केला आहे.यामध्ये समाजातील विविध घटक सहभागी होत आहे. विशेषतः डॉक्टर, व्यापारी वर्गानेही याचे स्वागत केले आहे. सहभागी होणाऱ्या जोडप्यांना संसार बाटली, कपड्यांचा आहेर तसेच पाच लाखांचा विमा दिला जाणार आहे.समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत हा पुनर्विवाह सोहळा होत असून सामाजिक बदलाची ही नांदी आहे.बुलढाण्यामध्ये सुरू झालेली ही चळवळ अनेक जिल्ह्यांमध्ये पसरत असून विधवा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, समाजाने त्यांना सामाजिक घटक म्हणून स्वीकारावे तसेच विधवा महिलांच्या मुलांना स्वीकारण्याची तयारी असेल, अशा विवाह इच्छूक तरुणांनी या सोहळ्यामध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डी.एस. लहाने यांनी केले आहे.
Users Today : 18