बुलडाणा अर्बन-सहकार विद्या मंदिरतर्फे दावत ए इफ्तार उत्साहात:-डॉ. सय्यद रफीक पारनेरकर यांचे प्रतिपादन

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी

रोजा म्हणजे तळागाळातील कफल्लक, भणंग, बिनचेहऱ्याच्या माणसाच्या तहानभुकेची जाणीव श्रीमंतांना, धनिकांना व्हावी, त्यांच्या पदरात पडलेले उपेक्षेचे जीणे महिनाभर कळकळ उपवास धरून अनुभवत्ता यावे, रोजा फक्त तहान आणि भुकेपर्यंत मर्यादित नसतो, रोजा जिभेचा असतो, डोळ्यांचा असतो, कानांचा असतो, हातापायाचा असतो, जिभेने वाईट बोलायचे नसते, कोणाची निंदानालस्ती करायची नसते, कानांनी चहाळक्या ऐकायच्या नसतात, कोणावर विनाकारण हात उगारायचा नसतो, वाईट ठिकाणांच्या रोखाने पाय वळणार नाही याची दक्षता घ्यायची असते, असे प्रतिपादन प्रख्यात वक्ते, इस्लामधर्माचे प्रगाढ अभ्यासक डॉ. सय्यद पारनेरकर यांनी केले.
सामाजिक ऐक्याचे बाहू बळकट करण्यासाठी कृतीशीलतेच्या पातळीवर राज्यभर सदैव अग्रेसर असणाऱ्या बुलढाणा अर्बन आणि सहकार विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने १९ मार्च पवित्र रमजान महिन्याच्या मंगलपांवर दावते इफ्तारचे सहकार विद्यामंदिर ऑडिटोरियममध्ये आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी होते. प्रमुख अतिथी म्हणून बुलडाणा अर्बनचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर, सहकार विद्या मंदिराच्या अध्यक्षा कोमलताई झंवर चांडक, स्टेट बैंक ऑफ इंडियाचे इक्बाल अहेमद यांची उपस्थिती होती.प्रास्ताविकपर मनोगतात डॉ. सुकेश झंवर म्हणाले, सर्वधर्मीयांच्या उत्सवात सहभागी होऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा समष्टीपूर्ण कित्ता बुलडाणा अर्बन आजतागायत निष्ठेने, भक्तीने गिरवत आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, सर्वधर्मीयांच्या सणावारात बुलडाणा अर्बन उत्साहाचे रंग भरत आली आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध प्रदेश या तीन राज्यात बुलडाणा अर्बनचा डोलारा पसरला असून देशाचे आठ राज्य बुलडाणा अर्बनचे कार्यक्षेत्र आहे. बुलडाणा, अकोला, जळगाव या तीन जिल्ह्यात सहकार विद्यामंदिर विद्यादानाचे पवित्रकार्य करत आहे. २४ हजार कोटींची उलाढाल असलेल्या बुलडाणा अर्बनचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्य सर्वश्रुत आहे. अनेक विधायक कार्याच्या उतरंडी रचत बुलडाणा अर्बनची वाटचाल दिमाखदारपणे सुरू असल्याचे डॉ. झंवर म्हणाले.इस्लाम धर्मातला पवित्र महिना रमजान आणि या रमजान महिन्यात धरल्या जाणाऱ्या ३० कडकडीत उपवासाचे महत्त्व विशद करताना डॉ. सब्यद रफीक पारनेरकर पुढे म्हणाले की, रमजान या पवित्र मासात अल्लाह रब्बूल इज्जतने पैगंबरे आखिरुजजमां हजरत मोहंमद सललल्लाहो व अलैह वसल्लम यांच्यावर आकाशी ग्रंथ फुरकाने हमीद, कुरआने मजीद उतरविला, पवित्र कुरआन फक्त मुस्लिमांसाठी नसून सकल मानवजातीच्च्या सर्वकष कल्याणासाठी आहे. कुरआनच्या केंद्रस्थानी फक्त माणूस आहे. बुलडाणा अर्बनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल जिल्ह्यातील मुस्लिमबांधवांच्या वतीने डॉ. सुकेश झंवर यांचा सामूहिक सत्कार करण्यात आला.

0 9 5 2 9 9
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *