पाडळी शिंदे:-विशेष प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या सुरा येथील अल्पभूधारक शेतकरी तथा माजी सरपंच दिनकर मोतीराम चेके (वय ७०) यांनी स्वतःच्या शेतात आंब्याच्या झाडाला नापिकी व वाढलेल्या कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २१ मार्च रोजी उघडकीस आली.देऊळगाव तालुक्यातील राजा सुरा येथील रहिवासी व माजी सरपंच दिनकर मोतीराम चेके हे २० मार्च रोजी रात्री दहा वाजता घरून निघून गेले असता त्यांची परिवाराने शोधाशोध केली.दरम्यान, २१ मार्च रोजी सकाळी त्यांचा मृतदेह शेतातील गट नंबर ३७ मध्ये आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. सततची नापिकी व बँकेच्या कर्जाचा वाढता डोंगर याला कंटाळून वैफल्यग्रस्त मनस्थिती गळफास घेऊन जीवन यात्रा संपविली, अशी माहिती मृतकाच्या नातेवाईकांनी दिली. सदर घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका रामेश्वर आंधळे, भागवत गिरी यांनी पंचनामा केला व उत्तरीय तपासणी देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात करण्यात येऊन शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतक चेके यांच्या पश्चात्य पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा आप्त परिवार आहे.
Users Today : 27