चिखली:-तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील किन्हीनाईक येथील शेतकरी सुभाष टेकाळे यांच्या शेतातील गोठ्याला २३ मार्च रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गोठ्यातील शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले असून जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.सदर आगीत तुषार संच ३८ हजार ५०० रुपये, रेनपाईपः १५ हजार रुपये, टिनपत्रे (२२ नग) २५ हजार रुपये, फवारणी नळ्या १२ हजार रुपये, ठिबक संच नळी ४० हजार रुपये व जनावरांसाठी चार ट्रॉली कुटार २० हजार रुपये, असे एकूण दीड लाख रूपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस नेते राम डहाके यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तहसीलदार चिखली यांना घटनेची माहिती दिली. चिखली येथील अग्निशमन दल आणि किन्हीनाईक गावातील तरुणांच्या मदतीने आग विझवण्यात आली. मात्र, तोपर्यंत गोठ्यातील साहित्य जळून खाक झाले होते. सततचा दुष्काळ, नापिकी आणि अतिवृष्टीमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर या आगीने मोठे संकट ओढवले आहे. महसूल विभागाने नुकसानीचा पंचनामा केला असून, शासनाने सुभाष टेकाळे यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी राम डहाके आणि गावकऱ्यांनी केली आहे. यावेळी अशोक अजबे, गजानन टेकाळे, अंबादास शेंबेकर, राजेंद्र ननकर, मधुकर टेकाळे यांच्यासह गावातील तरुण, कोतवाल आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
Users Today : 42