साखरखेर्डा:-तालुका प्रतिनिधी
केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करीत राष्ट्रीय पेयजल योजना आणली. या योजनेअंतर्गत सिंदखेडराजा तालुक्यात ५० हुन अधिक ठिकाणी काम सुरू आहे. गेल्या चार वर्षांत एकही योजना पुर्ण झाली नाही. ‘ना नल, ना पाणी, जल जिवनकी अधूरी कहाणी’, अशी अवस्था या योजनेची झाली आहे.शिंदी या गावाची लोकसंख्या चार हजारांच्या आसपास असून या गावांसाठी राष्ट्रीय पेयजल योजना २०२१-२२ साली मंजूर झाली. संबंधित ठेकेदार यांनी प्रथम गायखेडी (साखरखेर्डा) येथील तलावात विहीर खोदली. त्या विहिरीजवळ रुम तयार करण्यात आली. तेथून शिंदी गावापर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली. जलकुंभ बांधकाम करण्यात आले. गावात अंतर्गत जलवाहिनी टाकण्यात आली. वरवर ही कामे दिसत असली, तरी या योजनेची अनेक कामे रेंगाळत ठेवून ठेकेदाराने पलायन केले. वरीष्ठ अधिकारी आणि ठेकेदार यांची मिलीभगत असल्याने या योजनेचा बोऱ्या वाजला की काय?, योजनेचे त्यांना काहीच देणंघेणं नसेल?, असेच विचार सिंदखेडराजा तालुक्यातील नळयोजनांची कामे पाहिल्यावर मनात येतात. शिंदी येथील योजना एक कोटी ९० लाखांची असून विहिरीचे काम ईस्टीमेट नुसार नाही. मोटार पंप बसविला नाही, रुममध्ये ना मिटर, ना सुरु करण्याची साधने देखील उपलब्ध नाही. पाईप लाईन शेतातून असल्याने शेतकरी पीक पेरलेले असताना दुरुस्ती करीता खड्डे खोदून काम करु देत नाही. सदर पाईपलाईन ही राताळी-शिंदी रस्त्याने करण्यात आली नाही. जलशुद्धीकरण प्रकल्प नाही. आणि गावात पाणी पुरवठा झाला नाही. या योजनेतून ९५ टक्के बील काढून ठेकेदार मोकळा झाला आहे. त्यामुळे ही राष्ट्रीय पेयजल योजना नेमकी कोणासाठी झाली?, असा प्रश्न उभा ठाकला आहे. या योजनेतून गावाची तहान तर भागत नाही, पण ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी आपली आर्थिक तहान नक्कीच भागविली, असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.
Users Today : 42