बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
जागतिक वनदिनानिमित्त बुलढाणा प्रादेशिक वनविभागाच्या वतीने ‘रन फॉर फॉरेस्ट १.०’ ही मॅरेथॉन स्पर्धा पार पाडली. यामध्ये ६०० हून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये विजयी ठरलेल्या धावपटूंना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत झाडे लावण्याची आणि त्यांचे संरक्षण करण्याची गरज अधोरेखित केली. एक दिवस धावून पर्यावरण संवर्धन करता येणार नाही, तर हे दैनंदिन सवयीत आणले पाहिजे. झाडे लावून त्यांचे संगोपन करणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाने यात सहभागी व्हायला हवे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी वनविभागाच्या वतीने १ हजार आंब्याची झाडे वितरित करण्यात आली. उपवनसंरक्षक सरोज गवस यांनी ‘फॉरेस्ट आणि फूड’ या संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट केले. जंगल टिकवण्यासाठी नागरिकांनी वन विभागासोबत हात मिळवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. १० किमी मॅरेथॉनमध्ये जयेश पाटील प्रथम, वैभव बरडे व्दितीय, जाहीन मदे खान तृतीय तर प्रणाली शेगोकर यांनी प्रोत्साहनपर पारितोषिक पटकाविले. ५ किमी मॅरेथॉनमध्ये प्रथम गौरी राठोड, व्दितीय लक्ष्मी शेळके, तृतीय दिव्या जाधव, ३ किमीमध्ये प्रथम नेहा जाधव, व्दितीय प्रगती राऊत तर मृणाल पडोळसे ही तृतीय आली.यावेळी विभागीय वन अधिकारी विपुल राठोड, जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी डॉ. पराग नवलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखेले, सहायक वनसंरक्षक अश्विनी आपेट, तसेच जिल्ह्यातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन चंद्रशेखर जोशी तर आभार राऊत यांनी मानले.
Users Today : 50