बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
राज्यात दहावी व बारावीची परीक्षेनंतर २३ मार्च रोजी बुलढाणा जिल्ह्यातील १४ हजार २८५ असाक्षर आजी-आजोबांनी परीक्षा दिली. यावेळी उल्हास अॅपवर नोंदणी झालेल्या जिल्ह्यातील १५ हजार १६० असाक्षर आजी-आजोबा पैकी जवळपास १४ हजार २८५ नवसाक्षरांनी परीक्षेला हजर राहून वाचन, लेखन व संख्यात्मक मूल्यामापनासाठी जीवनातील प्रथमच पेपर दिला. यावेळी काही परीक्षा केंद्रावर प्रथमच परीक्षा देण्यासाठी जात असलेल्या आजी-आजोंबाचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्य हजर होते. त्यामुळे अनेक परीक्षार्थीच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून आला. तर अनेकांनी अपयश आल्यास पुन्हा देपर देण्याचा निर्धार केला. केंद्र शासनाच्या नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागातून असाक्षरांचे सर्वेक्षण करण्यात आले. २०२७ पर्यंत १०० टक्के नागरिकांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेंतर्गत राज्यात ५ लाख ७७ हजार ३३७ प्रौढ निरक्षरांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी जवळपास ४ लाख ७० हजार ४४७ नवसाक्षर परीक्षा देणार होते. बुलढाणा जिल्ह्यात २०२४-२५ साठी उल्हास अॅपद्वारे १५ हजार १८० निरक्षरांची नोंदणी करण्यात आली. त्यांना शिकविण्यासाठी सर्व १३ तालुक्यात ७७७साक्षरतेचे वर्ग सुरू केले होते. या वर्गात शिकलेल्यांची नवसाक्षरांनी रविवारी परीक्षा दिली. प्रत्यक्षात नोंदणी झालेल्या नवसाक्षरांपैकी १४ हजार २८५ नवसाक्षरांनी परीक्षा दिली. चिखलीत सर्वाधिक नवसाक्षरांची हजेरी उल्हास अॅपव्दारे नोंदणी झालेल्या नवसाक्षरांपैकी १४ हजार २५८ नवसाक्षरांनी परीक्षा दिली. त्यात चिखली तालुक्यात सर्वाधिक २ हजार ३०९ निरीक्षरांनी परीक्षा दिली. तर बुलढाणा तालुक्यात १ हजार १७१, खामगाव १ हजार ३७३, देऊळगाव राजा तालुक्यात ६६२, मोताळा ६९३, लोणार ७५१, मलकापूर ८७०, मेहकर १ हजार ३४९, जळगाव जामोद १ हजार १९२, नांदुरा १ जार ५७०, संग्रामपूर ५८२, शेगाव ९२० व सिंदखेड राजा तालुक्यात ८४३, असे एकूण १४ हजार २८५ नवसाक्षरांनी परीक्षा दिली. नवभारत साक्षरता अभियानाला प्रतिसाद प्राथमिक शिक्षण, डिजिटल आणि आर्थिक साक्षरता तसेच १५ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना ज्यांनी शाळेत जाण्याची संधी गमावली आहे, त्यांना जीवनाची गंभीर कौशल्ये शिकविण्यासाठी २०२२ ते २०२७या पाच वर्षात साक्षर करण्यासाठी नवभारत साक्षरता अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत रविवारी झालेल्या परीक्षेला प्रतिसाद मिळाला असला तरी जास्तीत जास्त नवसाक्षर जोडण्यासाठी या अभियानाची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
Users Today : 50