मोताळा:-तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील चेतना विकास प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यालय परडा येथे जागतिक जलदिन कार्यक्रमाचे औचित्य साधून २३ मार्च रोजी सकाळी ९ ते ११ दरम्यान जल साक्षरता दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका आकांक्षा सचिन मोठे तर प्रमुख अतिथी म्हणून गजानन उबाळे, शिक्षीका जयश्री शास्त्री, शिक्षिका कुमुदिनी व पायल व अध्यापक उपस्थित होते. यावेळी जलपूजन करुन सर्व उपस्थितांनी व विद्यार्थ्यांनी पाणी संवर्धनाची शपथ घेतली. समायोचित मनोगतामध्ये गजानन उबाळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पाणी फाउंडेशनमध्ये केलेल्या कार्याचा अनुभव सांगत त्यांच्या कुटुंब पातळीवर जलसंवर्धनासाठी राबवलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला. तसेच त्यांनी त्यांच्या शेतात ६० झाडे लावून ती यशस्वीरित्या जगवल्याची माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी पाणी वाचविण्यासाठी आपल्या परिसरात काय उपाययोजना केल्या याचेही विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक उदाहरणांद्वारे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये पाणी बचतीचे महत्त्व रुजावे यासाठी, पृथ्वीवरून पाणी कसे ओढतो या संकल्पनेवर आधारित एक खेळ घेण्यात आला. त्यानंतर रिसर्च फेलो अक्षय डोसे यांनी त्यांच्या पाणी प्रकल्पावर पावर पाईंट प्रेझेनटेशनच्या माध्यमातून पाण्याचा आपण कुठे-कुठे वापर करतो, नद्यांची आज काय अवस्था झाली, याबाबत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत जलसंकट, पाण्याचा अपव्यय, पर्जन्य जलसंचय आणि जल व्यवस्थापन याबाबत सादरीकरणाच्या माध्यमातून ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ या संकल्पनेचे महत्त्व पटवून दिले. यावेळी सर्वांना जल संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.
Users Today : 52