वर्दडी बुद्रुक:-विशेष प्रतिनिधी
तहसीलदारांना अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने संजय गांधी निराधार, श्रावण बाळ या योजनांच्या पात्र लाभार्थ्यांसाठी महाडीबीटी कॅम्प राबविण्याबाबत अशोक राजे जाधव यांच्या नेतृत्वात नागरिकांच्या विविध अडीअडचणीच्या बाबतीत निवेदन देण्यात आले. दोन दिवसांत पूर्तता करण्याचे आश्वासन तहसीलदार अजित दिवटे यांनी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्षांसह सहकाऱ्यांना दिले.सिंदखेड राजा तहसील कार्यालयात निराधार योजनेतील लाभार्थ्यांची हेळसांड होत असल्याचे अखिल भारतीय छावा संघटनेला समजले. त्यानुसार निवेदन देण्यात आले. वयोवृद्ध नागरिक यांचा वेळ आणि आर्थिक भुर्दंड होत असल्याने संजय गांधी निराधार, श्रावण बाळ या प्रकारच्या योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना सोयीचे होईल म्हणून सिंदखेड राजा तालुक्यात गावोगावी महाडीबीटी कॅम्प घेण्याची मागणी करण्यात आली. सदर योजनेतील लाभार्थ्यांना तहसील कार्यालयात संबंधित कर्मचाऱ्यांकडून सन्मानाची वागणूक मिळत नसल्याबाबत आणि तहसील कार्यालयात कामकाजासाठी ५० ते ६० किमी अंतराहून येणारे वयोवृद्ध नागरिक त्रस्त असतात त्यांना आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली.कॅम्प घेतल्यास संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील अपंग व वयोवृद्ध लाभार्थी अशिक्षित, वयोवृद्ध आणि अपंग असल्याने त्यांना अर्ज भरण्यासाठी मानसिक व शारीरिक त्रास या अभियानामुळे सहन करावा लागणार नाही, त्याचप्रमाणे अर्ज भरण्यासाठी, आधार मोबाइल क्रमांक लिंक पडताळणीसाठी तहसील कार्यालयात गर्दी होणार नाही.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा कोल्हे, बाळासाहेब शेळके, रफीक सय्यद, नारायण मस्के, नरहरी तायडे, नीलेश देशमुख, अर्जुन एखंडे, गजानन राजे जाधव उपस्थित होते.
Users Today : 52