चिखली:-तालुका प्रतिनिधी
खडकपूर्णा सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी जीवन संजीवनी देणारा प्रकल्प असल्याचे प्रतिपादन तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांनी केले. सोबतच महसूल विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देत लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग, खडकपूर्णा प्रकल्पाच्या वतीने देउळगाव घुबे येथे जलजागृती सप्ताह व जागतिक जलदिनाचा समारोप सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. खडकपूर्णा सिंचन प्रकल्प बुलढाणा जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यातील खडकपूर्णा नदीवर बांधण्यात आलेला जलाशय आहे. प्रकल्पाची लांबी २१६० मीटर तर उंची १८.५० मीटर आहे. धरणात २८२ मीटर लांबीचा मध्यवर्ती गेटेड स्पिलवे असून, १८,०४७ चौरस मीटर / सेकंद क्षमतेच्या पुरातून जाण्यासाठी १२ मीटर ७ ८ मीटर आकाराचे १९ वक्र दरवाजे आहेत. कालवा प्रणालीमध्ये ३८ किमी लांबीचा उजवा कालवा, १० किमी लांबीचा डावा कालवा आणि उपसा सिंचन योजना कार्यान्वित आहे. या प्रकल्पाद्वारे एकूण २५९०० हेक्टर सीसीएची पूर्तता करण्यात येत असून चिखली, देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा या तालुक्यांतील ७७गावांना सिंचनाचा लाभ मिळाला आहे. प्रकल्पातून ३४ गावांना घरगुती वापरासाठी ४.६८७ दशलक्ष घनमीटर पाणी आणि औद्योगिक वापरासाठी ३.१० दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. उपविभागीय अभियंता नरेश घुले यांनी पाणी वापर संस्थांना पाणी मागणी आणि कायद्यांविषयी माहिती दिली. भागवत म्हस्के यांनी पाण्याची बचत आणि काटकसरीने वापर करण्याचे महत्त्व सांगितले. शेनफडराव घुबे यांनी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पाणी मागणी आणि आरक्षण कायम राखण्यासाठी संघर्ष करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमात जलजागृती सप्ताहानिमित्त पार पडलेल्या निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफेरी काढून पाणी बचतीचा संदेश दिला. यावेळी भागवत म्हस्के, जानकीदेवी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी देउळगाव घुबे सरपंच, सदस्य, पाणी वापर संस्था प्रतिनिधी, शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते.
Users Today : 52