बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी बुलढाणा शहरात पॉलिक्लिनीकला जागा मिळवण्यासाठी, माजी सैनिकांना कॅन्टीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करून सर्व माजी सैनिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, म्हणून प्रामाणिक प्रयत्न केल्याचे प्रतिपादन ब्रिगेडियर राहुल दत्त यांनी केले.ब्रिगेडियर राहुल दत्त यांचे नुकतेच भुसावळ येथून दिल्ली येथे स्थानांतरण झाले आहे. या निमित्त बुलढाणा पॉलीक्लिनिक येथे २४ मार्च रोजी त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नल सुहास जतकर हे होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लेफ्टनॅन्ट कर्नल अनुपम श्रीवास्तव अॅडमिनिस्ट्रेशन कमांडंट स्टेशन हेडक्वार्टर भुसावळ, स्वॉड्रन लीडर रूपाली सरोदे सैनिक कल्याण अधिकारी बुलढाणा, डॉ. पल्लवी आरु वैद्यकीय अधिकारी बुलढाणा, डॉ. सुनील मानमोडी डेंटल ऑफिसर बुलढाणा यांची उपस्थिती होती. ब्रिगेडियर राहुल दत्त स्टेशन कमांडर भुसावळ यांनी ५ सप्टेंबर २०२३ पासून ते आतापर्यंत बुलढाणा जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न केला. तसेच याप्रसंगी बोलताना सांगितले की लवकरच बुलढाणा पॉलीक्लिनिकची सुसज्ज व स्वतंत्र इमारत तयार होणार आहे. या नवीन इमारतीसाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. सोबतच माजी सैनिकांना कॅन्टीनच्या पण सुविधा बुलढाणा येथे उपलब्ध होणार आहेत. या प्रसंगी सुभेदार मेजर शेळके, डोंगरदिवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी बुलढाणा जिल्हातील माजी सैनिक, वीर माता, वीर पिता यांचेसह पॉलीक्लिनिकचे कर्मचारी उपस्थित होते.
Users Today : 63