देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी
‘पुण्यनगरी’च्या वृत्तानंतर खडबडून जागे झालेल्या महसूल विभागाने जिल्हा स्तरीय शोध व बचाव पथकाच्या सहाय्याने तालुक्यातील खडकपूर्णा धरणाच्या जलाशयामध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटींची शोध मोहीम राबविली. दुपारी ४ वाजता दरम्यान गारखेड व मंडपगाव शिवारात चार फायबर बोटी व चार इंजिन बोटी, अशा एकूण आठ बोटी पकडून स्फोटकांच्या साह्याने नष्ट करण्यात आल्या. मात्र, या बोटीव्दारे रेती उपसा करणारे मजूर पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यामुळे सदर बोटी कोणाच्या?, या सुगावा लागु शकला नाही. खडकपूर्णा जलाशयातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बोटीच्या साह्याने मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा होत असल्याचे वृत्त दै. ‘पुण्यनगरी’ ने प्रकाशित केले होते. सदर वृत्त प्रकाशीत होताच कुंभकर्णी झोपेत असलेल्या संबंधीत यंत्रणा प्रमुखांकडून २४ मार्च रोजी जिल्हा स्तरीय शोध व बचाव पथकाच्या सहाय्याने जलाशयात बोटींची शोधमोहिम राबविण्यात आली. जलाशयाचा परिसर मोठा असल्याने पथकाला विविध अडचणींचा सामना करावा लागला. बेशरमाच्या झाडीमध्ये लपविण्यात आलेल्या बोटी शोधून त्या किनाऱ्यापर्यंत पोहोचण्यासही बऱ्याच अडचणी आल्या. त्यानंतर जलाशयाच्या काठावर जिलेटिनच्या साह्याने तब्बल चार वेळा स्फोट करून रात्री ८ वाजता सदर पकडण्यात आलेल्या ८ बोटी नष्ट करण्यात आल्या. मात्र, ज्या बोटीवर कारवाई करणे आवश्यक होते, त्या बोटी जलाशयातून पथकाच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्या, हे विशेष जिल्हाधिकारी किरण पाटील व उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नियंत्रणात नायब तहसीलदार प्रवीण घोटकर, नायब तहसीलदार सायली जाधव, मंडळ अधिकारी विजय हिरवे, काशिनाथ ईप्पर, रामदास मांटे, प्रल्हाद केदार, ग्राम महसूल अधिकारी विलास नागरे, परमेश्वर बुरकुल, संजय हंडे, सुरेश डोईफोडे, मधुकर उदार, संजय बरांडे, राजू तागवाले, आकाश खरात, तेजस शेटे, कृष्णा खरात, खडकपुर्णा प्रकल्प उपविभागाचे अधिकारी एस.जे.तल्हार, शोध व बचाव पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तारासिंग पवार, पोलीस अंमलदार गुलाबसिंग राजपूत, संदीप पाटील, सलीम बरडे, प्रदीप सोनुने, सपोनिक नारायण गीते, पोलीस अंमलदार डिघोळे, ठाकरे व त्यांच्या धरणाच्या जलाशयामध्ये सदर बोटी अवैधपणे प्रवेश करतात. त्यामुळे या बोटींच्या विरोधात आता नियमितपणे मोहिम सुरु राहणार आहे. सोबतच कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग यांनी त्यांच्या कार्यालयामार्फत मोहीम राबवून बोटीवर कारवाई करण्यात यावी, याबाबत त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी दिली.
Users Today : 63