चिखली:-तालुका प्रतिनिधी
खडकपूर्णा प्रकल्पाच्या इसरूळ परिसरातही प्रशासनाने रेतीमाफियांना चांगलाच दणका दिला. चार बोटी पकडून त्या ब्लास्टिंग करत उडविण्यात आल्या. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाण्याचे उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्या नेतृत्वात धडाकेबाज कारवाई करण्यात आली. शासनाचे रेती धोरण फसल्याने बांधकामासाठी लागणारी रेती वैध पद्धतीने मिळत नाही. यामुळे बांधकाम करणारे नागरिक जेरीस आले आहेत. याचाच फायदा उठवत रेतीमाफिया रेतीची तस्करी करून लाखो रुपयांची माया जमवत आहेत. खडकपूर्णा प्रकल्पामधून अवैधरित्या रेती उपसा सुरूच आहे. विशेष म्हणजे अत्याधुनिक बोटींद्वारे रेती उपसल्या जात आहे. अव्वाच्या सव्वा भावाने रेती विकून माफिया गब्बर झाले आहेत. आता मात्र महसूल प्रशासन कारवाईसाठी सरसावले आहे. उपविभागीय अधिकारी शरद पाटील, चिखली तहसीलदार संतोष काकडे, पोलीस विभागाचे प्रतिनिधी, तलाठी, मंडळ अधिकारी भगवान पवार, ग्राम महसूल अधिकारी योगेश भुसारी, सुनील डव्हळे, अनिल बोंद्रे, विनोद गिरी, नितीन काळे, महसूल सेवक प्रभाकर इंगळे, वाहन चालक संतोष भोपळे, आपत्ती व्यवस्थापन पथकाचे संभाजी पवार, श्रीकृष्ण जाधव, सहायक फौजदार तारासिंग पवार, पोहेकों राजपूत, पाटील, सोनवणे, बरडे, विलास पवार, पीएसआय जारवाल, सोनकांबळे, किशोर जाधव, चन्नाकेशला यांनी इसरूळ भागात रेती उपसा करणाऱ्या चार बोटी पकडल्या.या बोटी उडविण्याकरिता सिंदखेड राजाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांचे सहकार्य घेण्यात आले.माहिती देण्याचे नागरिकांना आवाहन बोटींमध्ये असलेली रेती प्रशासनाने जप्त केली. नंतर घटनास्थळीच ब्लास्टिंग करून बोटी उडविण्यात आल्या. अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनीही अवैध रेती उपसा होत असल्यास प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Users Today : 65