शेंदुर्जन:-तालुका प्रतिनिधी
सद्यस्थितीमध्ये शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यांतर्गत शेतरस्ता खुला करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे व नायब तहसीलदार महसूल प्रवीणकुमार वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच दिवसापासून बंद असलेला नागझरी येथील शेत रस्ता मंडळ अधिकारी सर्जेराव साळवे यांच्या पुढाकाराने सर्व संमतीने खुला करण्यात आला.अंदाजे एक किलोमीटर लांबी असलेला नागझरी येथील शेतरस्ता बऱ्याच दिवसापासून बंद होता. तेथील शेतकऱ्यांना शेत मशागतीची कामे करणे, शेतमालाची ने आण करणे यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यासाठी शेतकरी बांधवांनी नायब तहसीलदार प्रवीणकुमार वराडे यांचेकडे अर्ज केला होता. सदरचा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी मंडळ अधिकारी शेंदुर्जन यांच्याकडे आला असता मंडळ
अधिकारी सर्जेराव साळवे यांनी शेत रस्त्याची पाहणी करून तेथील सर्व संबंधित खातेदारांची समजूत काढून खातेदारांमध्ये समेट घडवून आणून सदर रस्ता हा जेसीबीच्या साह्याने खुला करण्यात आला. सदर रस्ता खुला झाल्याने अंदाजे ५० ते १०० शेतकरी बांधवांना या शेत रस्त्याचा लाभ होणार आहे.त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर शेतरस्ता खुला करतेवेळी भगवान शिंगणे, रामेश्वर कोरकने, शेख वजीर शेख यासीन, आदिनाथ नवले, तुकाराम गुंजकर, उमा शिंगणे या शेतकरी बांधवांसह ग्राम महसूल अधिकारी ज्ञानेश्वर दांडगे, महसूल सेवक अविनाश गाडे व संतोष सांगळे हे हजर होते. शेत रस्त्याचे वाद आपसात मिटवून सलोखा निर्माण करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट असल्याचे मंडळ अधिकारी सर्जेराव साळवे यांनी यावेळी सांगितले.
Users Today : 96