वधू मिळविण्यासाठी वरपित्यांचा आटापिटा; नवऱ्या मुलांची अडचण

Khozmaster
1 Min Read

चांडोळ:-विशेष प्रतिनिधी 

लग्नाचे वय वाढत चालले आहे. अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही विवाह जुळत नाही. अनेक वधू-वर सूचक मेळावे पालथे घालून झाले. उपासतापास, नवसही केले. मात्र, अजूनही लग्न जमत नसल्याने लग्नाळू मुलांची चिंता वाढली आहे. आई-वडिलही हतबल झाले आहेत. अशा स्थितीत मुलासाठी स्थळ पाहायला जाणारी मंडळी ‘तुम्ही फक्त मुलगी द्या, लग्नाचा जो काही खर्च आहे, तो आम्हीच करतो’ ! असे म्हणत वधूपित्याला गळ (अट) घातली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.नोकरीवाल्या मुलाचे जमते, मात्र उच्चशिक्षित असूनही काही कामधंद्याला लागला नाही म्हणून सोयरिक जुळवताना अडचणी येत आहेत. सर्वांनाच नोकरी मिळेल असे नाही, तर खासगी कंपन्यांत काम चांगल्या पगारावर काम करणारा मुलगादेखील पसंत केला जातो. मात्र, दहा, पंधरा हजारांवर काम करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना लग्नाकरिता मुलीच मिळत नाही. त्यातच वय वाढत चालल्याने लग्नाविना राहण्याची वेळ येते की काय ?, अशी भीती तरुणाईला वाटत आहे. मुलींची घटती संख्या याला कारण आहे. वंशाचा दिवा हवा म्हणून गर्भातच मुलींचा गळा घोटल्याचा हा परिणाम आहे. मुलांमागे मुलींचे प्रमाण कमी आहे. आता मात्र मुलांचे हात पिवळे करण्यासाठी वडिलांची दमछाक होत आहे. जिकडे तिकडे सद्या एकच प्रश्न उपस्थित होत आहे. आमचा मुलगा आहे, एखादी मुलगी मिळेल का? बाकी सर्व आम्ही करू, फक्त मुलीच्या वडिलांना सांगा, ही अवस्था उपवर मुलांच्या वडिलांची झाली आहे.

0 9 5 3 7 0
Users Today : 96
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *