पाडळी शिंदे:-विशेष प्रतिनिधी
औरंगजेबाच्या कबरीबद्दल बोलले जात आहे. पण, त्याने जेवढे कापले नाही, तेवढे सरकारच्या धोरणामुळे मेले आहेत. आता कोणाची कबर खोदायची? असा सवाल ‘प्रहार’चे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी शिवणी आरमाळ येथे केला.शिवणीचे रहिवासी आदर्श शेतकरी कैलास नागरे यांनी शेतकऱ्यांसाठी आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन आज बच्चू कडू यांनी केले. परिवारातील सदस्यांना धीर दिला. मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याची ग्वाही दिली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना कडू म्हणाले, स्वतःसाठी नाहीतर परिसरातील शेतकऱ्यांचे काही भले व्हावे, या भावनेतून आलेले नैराश्य, अधिकाऱ्यांनी केलेली घुमवाघुमवी यातून त्यांची आत्महत्या झाली. त्यांच्या कुटुंबीयांसाठी आम्ही जेवढी मदत करायची ती करू, सरकारने उघड्यावर आलेला परिवाराला सावरले पाहिजे. कैलास यांनी केलेली आत्महत्या तपासली पाहिजे. ती एका परिवारासाठी नव्हती, अनेक कुटुंबांकरिता होती. सरकारने जबाबदारी घ्यायला हवी. असेही ते म्हणाले.विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी दिलेले संभाषण चुकीचे होते. वास्तविक त्यातून मार्ग कसा निघेल हे सांगायला पाहिजे होते, असे सांगत कडू म्हणाले, खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी मार्गाने वळवायचे आहे. एका इंजिनीअरला बुद्धी सुचणार नाही, एवढी कैलासने बुद्धी दिली होती. चिखलीला जाणाऱ्या कालव्यातून फक्त या मार्गाने पाणी वळविले तर नदीतच येईल आणि धरणही भरेल. इंजिनीअरला पैसे देऊन अक्कल आली नाही. एका शेतकऱ्याने अक्कल दिली, चांगली माहिती दिली. मूळ कारण राजकारण आहे. या देशामध्ये हे काही यापुरते मर्यादित नाही. एका वर्षाला २ ते ३ लाख लोक आत्महत्या करतात. अर्ध्याधिक आत्महत्या शेतकरी व त्यांच्या मुलांच्या आहेत.निवडणुका या राजकारणामध्ये रोषाचे प्रतीक असतात. मतदान जेव्हा करतो तेव्हा आनंदाने देतो, किंवा रोष व्यक्त करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला, तो रोष व्यक्त करण्यासाठी आणि चांगले झाले तर आनंद व्यक्त करता यावा, याकरिता दिला, असेही कडू म्हणाले.शेतकऱ्यांचे बजेट तरी पवार सांगू शकतात का? केंद्र व राज्याच्या बजेटमध्ये काय अवस्था आहे. किती पैसा ठेवला. अजित पवारांनी दहा लाख कोटींचे बजेट सादर केले. त्यात शेतकऱ्यांसाठी किती पैसे ठेवले, हे सांगता येते का त्यांना विचारा ! ४५ लाख कोटींचे बजेट आहे केंद्राचे, त्यात शेतकऱ्यांसाठी किती पैसे ठेवले. एकंदरीत ही सगळी फसवाफसवी आहे. तरीही आम्ही भडकत नाही, असे आश्चर्यही बच्चू कडूंनी व्यक्त केले
Users Today : 95