शिवणीसह १४ गावांच्या पाणीप्रश्नावर लवकरच मंत्रालयात बैठक : अंबादास दानवे

Khozmaster
4 Min Read

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी 

१४ गावांसाठी सिंचनाच्या पाण्याचा लढा उभारून बलिदान दिलेले शेतकरी कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २७ मार्चला शिवणी आरमाळ येथे भेट देऊन सांत्वन केले. सर्वांनी धीर दिला. शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या पुढाकारातून जिल्हा शिवसेनेच्या वतीने पाच लाख रुपयांचा बचत ठेव स्वरूपातील (एफडी) निधी नागरे कुटुंबीयांकडे ना. दानवे यांच्या हस्ते सोपविण्यात आला. आतापर्यंत आलेल्या अनेक नेत्यांनी केवळ पोकळ आश्वासने दिली. शिवसेना (उबाठा) ने खऱ्या अर्थाने कर्तव्यनिधी दिल्याच्या भावना ग्रामस्थांनी बोलून दाखविल्या. यावेळी ना. दानवे यांनी कैलास नागरे यांचे कुटुंबीय ग्रामस्थांकडून पाणी समस्येची माहिती घेतली. यावर बोलताना ना. दानवे म्हणाले की, मराठवाड्याला, विदर्भाला पाणी मिळू नये यासाठी एक लॉबी काम करत आहे. कैलास नागरे यांची आत्महत्या नाही तर बलिदान आहे, कारण कैलास यांनी केवळ स्वतःपुरता विचार केला नाही. १४ गावांच्या सिंचनाचा प्रश्न सुटला पाहिजे ही त्यांची भावना होती, असे ना. दानवे म्हणाले. पाणी मिळवण्याच्या या लढ्यात शिवसेना आपल्या सोबत आहे. १० एप्रिलच्या आत संबंधित अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात एक बैठक लावू, असा शब्दही दानवे यांनी दिला.यावेळी जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, वसंतराव भोजने, छगन मेहेत्रे, जयश्रीताई शेळके, महिला आघाडी जिल्हाप्रमुख विजयाताई खडसन, जिल्हा संघटक डॉ. गोपाल बच्छिरे, प्रा. डी. एस. लहाने, जिल्हा समन्वयक संदीप शेळके, युवासेना जिल्हाप्रमुख नंदु कऱ्हाडे, उपजिल्हाप्रमुख प्रा. आशिष रहाटे, बद्री बोडखे, तुकाराम काळपांडे, तालुकाप्रमुख दादाराव खार्डे, महेंद्र पाटील, निबाजी पांडव, किसनराव धोंडगे, प्रा. सिद्धेश्वर आंधळे, माजी जि.प. सदस्य दिलीप वाघ, शहरप्रमुख गोविंदराव झोरे, किशोर गारोळे, श्रीकांत नागरे, राजू बुधवत, तारामती जायभाये, मोहंमद सोफियान, म्हसाजी वाघ, आकाश घोडे, रणजित मरमट, उल्हास भुसारे, गजानन घुगे, अक्षय ठाकरे, अजय शिवरकर, नितेश देशमुख, नागेश पहाड, गजानन डहाळके, दिलीप चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.कुटुंबाकडे लक्ष द्या; बहिणीची आर्त हाक याप्रसंगी स्वर्गीय कैलास नागरे यांचे बंधू तसेच बहीण स्नेहलताई यांनीदेखील आपल्या भावना मांडल्या. आमचा भाऊ हा आधुनिक शेतकरी होता. आज १५ दिवस झाले, सगळे जण नुसते भेटी देऊन जात आहेत. मात्र कुटुंबाकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. परिवार उघड्यावर पडला आहे. इकडे लक्ष द्या, अशी आर्त हाक स्नेहलताई यांनी दिली. हाच धागा पकडून अंबादास दानवे म्हणाले, नागरे परिवार उघड्यावर पडल्याच्या भावना या ठिकाणी स्नेहलताईंनी व्यक्त केल्या, मात्र संपूर्ण महाराष्ट्र हा शिवसेनेचा परिवार आहे. नागरे कुटुंबीयांच्या पाठीशी शिवसेना व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठामपणे उभे आहेत, असा धीर दानवे यांनी दिला,अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती दिली.कैलास नागरे यांच्या आत्महत्येसंदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात निवेदन केले. त्यांनी आठ किलोमीटरवरून शिवणी आरमाळ व इतर गावांना पाणीपुरवठा करण्यासंदर्भातचा मुद्दा मांडला. मात्र मुख्यमंत्र्यांना अधिकाऱ्यांकडून चुकीची माहिती देण्यात आल्याचा स्पष्ट आरोप नागरे यांचे बंधू गणेश नागरे आणि गावकऱ्यांनी विरोधी पक्षनेत्यांसमोर केला. महत्त्वाचे म्हणजे यावेळी सोबत असलेला नकाशादेखील त्यांनी समजावून सांगितला. नदीजोड प्रकल्पाच्या थापा मारल्या जात आहेत. आमचे नातू, पणतू ते पाणी पाहतील की नाही याची शंका आहे, असेही गावकरी म्हणाले. आठ किलोमीटर नव्हे तर केवळ ११० मीटर चारणी खोदली किंवा पाइप टाकले तरी या भागात पाणी येईल. खडकपूर्णा धरण भरल्यावर पर्यायी व्यवस्था म्हणून याकडे पाहिले जावे असेही यावेळी गावकरी म्हणाले. आम्ही कुणाचे राखीव किंवा हक्काचे पाणी मागत नाही. तर धरण भरल्यानंतर जे पाणी उरते ते आम्हाला मिळावे, अशी मागणी कैलास नागरे यांची होती. तीच आमची मागणी असल्याचे गावकरी म्हणाले.

0 9 5 4 0 7
Users Today : 133
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *