संतांच्या प्रासादिक वाणीनेच परमार्थ दृढ होतो : स्वामीजी

Khozmaster
2 Min Read

चिखली:-तालुका प्रतिनिधी 

मनुष्यातील भेददृष्टी नष्ट होऊन परस्पर एकतेची आणि समरसतेची भावना निर्माण झाल्यास भारतीय संस्कृतीचे दर्शन घडते. संतांच्या प्रासादिक वाणीनेच परमार्थ दृढ होतो, असे निरूपण स्वामीजी यांनी केले.गुरुदेव आश्रम (पळसखेड) येथे सुरु असलेल्या ३३ व्या वर्धापनदिन महोत्सवातील अखंड हरिनाम सप्ताहात तिसऱ्या दिवशी भक्तमाल कथेचे निरूपण करतांना ते बोलत होते. पुढे बोलताना स्वामीजी म्हणाले, भक्तमाल म्हणजे भक्तांची मालिका. सर्व महापुरुषांचे चरित्र नाभाजींनी आपल्या पवित्र वाणीतून प्रकट केले. नाभाजी हे दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही त्यांनी रसपूर्ण साहित्याची निर्मिती केली. रस हा शब्द सगुण असून तो भगवंताशी संबंधित आहे. नाभाजी सिद्ध पुरुष होते. भगवंताने लीला प्रकट करण्यासाठी योगमायेची मदत घेतली, त्याचप्रमाणे नाभाजींनी भगवंताला प्रकट करण्यासाठी रसाची मदत घेतली. ते महान संत होते. त्यांनी संत श्रीकृष्णदासजींचे वर्णन केले. त्यांच्या साहित्यात कमी शब्दांत गहन ज्ञान भरलेले आहे. श्रीकृष्णदास हे वल्लभाचार्यांचे शिष्य होते. त्यांनी अद्भुत काव्यांची निर्मिती केली. ते विद्वान कवी संत असून त्यांनी निर्दोष काव्याची निर्मिती केली. भगवंताच्या चिंतनाशिवाय त्यांच्या मनात दुसरा कोणताही विचार नव्हता. सद्‌गुरु हे पथदर्शक असतात. त्यांच्याशिवाय ज्ञान प्राप्त होणे अशक्य आहे. त्यांनी लिहिलेले प्रबंध, काव्य, साहित्य जोपर्यंत विद्वान त्यांचे महत्त्व स्पष्ट करणार नाहीत, तोपर्यंत त्यांचे महत्त्व कळणार नाही.
संतांकडे भगवंताची कृपा असते, त्यांच्या वाणीला प्रासादिक वाणी म्हटले जाते. भगवंताच्या कृपेशिवाय वाणीला महत्त्व प्राप्त होत नाही, ती प्रासादिक वाणी होऊ शकत नाही. कारण संतांच्या प्रासादिक वाणीनेच परमार्थ दृढ होतो. संतांच्या सहज बोलण्याचा लोकांच्या मनावर परिणाम होतो आणि प्रासादिक वाणीने हृदयपरिवर्तन होते. परमार्थात दृढता आवश्यक आहे, त्याशिवाय आनंदाची प्राप्ती होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. शेवटी त्यांनी फाल्गुन होळीचे महत्त्व विशद करून बालकृष्ण आणि यशोदा मातेची कथा सांगितली. २६ मार्च रोजी सकाळी विलास तांबट, दुपारी लक्ष्मण पाटील आणि नामदेव पाटील, तर संध्याकाळी बनवारी घनश्यामदास चौधरी यांनी फराळाची व्यवस्था केली होती. रात्री रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांनी कीर्तन सेवा दिली.

0 9 5 4 0 5
Users Today : 131
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *