खामगाव:-तालुका प्रतिनिधी
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा २०२४-२०२५ वर्षाच्या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून खामगाव तहसिल कार्यालयातील नायब तहसीलदार निखिल पाटील यांना राज्यस्तरीय द्वितीय पारितोषिक मिळाले आहे.प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता आणण्यासाठी तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा राबविण्यात येत आहे. सर्वोत्कृष्ट उपक्रम अंतर्गत शासकीय अधिकारी श्रेणीमध्ये नायब तहसीलदार निखिल राजू पाटील हे गडचिरोली जिल्ह्यातील तहसिल कार्यालय कुरखेडा येथे कार्यरत असताना त्यांनी तहसिल कार्यालयाचे मोबाईल अॅप सुरू करून या माध्यमातून नागरिकांना ऑनलाइन सेवांची माहिती एकाच अॅपद्वारे पुरविण्याची सेवा उपलब्ध करून दिली होती. यामुळे विविध शासकीय योजनांची नागरिकांना घरबसल्या मोबाईल वरून मिळणे शक्य झाले. यासोबतच नैसर्गिक आपत्तीच्या काळात पूर्व सूचना देण्यासाठी अॅपचा वापर झाला. सामान्य प्रशासन विभागामार्फत सन २०२४-२५ या वर्षाकरिता ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा राबविण्यात आली. या अभियानातंर्गत राज्यस्तरावर प्राप्त प्रस्तावापैकी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रशासकीय गतिमानता व सर्वोकृष्ट उपक्रम या वर्गवारीत राज्यस्तरीय निवड समिती मार्फत पात्र व अंतिम पुरस्कार विजेते जाहीर करण्यात आले. यामध्ये नायब तहसिलदार निखिल पाटील यांना द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. पारितोषिक वितरण मुख्यमंत्री यांचे हस्ते मुंबई येथे नागरी सेवा दिन २१ एप्रिल रोजी होणार आहे. पारितोषिकाचे स्वरुप तीस हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. द्वितीय पारितोषिक मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे २६ मार्च रोजी जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या हस्ते नायब तहसिलदार निखिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार खामगावचे उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, तहसिलदार सुनिल पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
Users Today : 160