देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील देऊळगाव राजा शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे अपूर्ण असलेले काम त्वरित पूर्ण करा, अशी मागणी श्रीराम जन्मोत्सव समितीने केली आहे.देऊळगाव राजा शहरात सालाबादाप्रमाणे यावर्षी ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे शोभायात्रेचे आयोजन केले आहे. सदरील शोभायात्रा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून मार्गस्थ होत असते. परंतु, यावर्षी या ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण स्थितीत असून शोभायात्रेमध्ये मोठ्या वाहनावर झाकी (देखावे) असतात. ही मोठी वाहने या रस्त्यावरून वळू शकत नाही. तसेच शोभा यात्रेमध्ये मोठ्या संख्येने रामभक्त सहभागी असतात. परंतु, रस्त्यामधील लोखंडी सळ्या उघड्या अवस्थेत आहे. सदरील सळ्यामुळे काही अप्रिय घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अपूर्ण रस्त्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होण्याची शक्यता आहे.त्यामुळे सदरील रस्त्याचे काम ५ एप्रिल २०२५ पूर्वी पूर्ण करून सहकार्य करावे, अशी मागणी श्रीराम जन्मोत्सव समितीचे मयुर सुरेशराव पुजारी, राजेश लक्ष्मणराव सपाटे, शुभम बोंद्रे, सचिन व्यास आदींनी एका निवेदनाव्दारे केली आहे.
Users Today : 160