किनगाव राजा:-विशेष प्रतिनिधी
येथील ग्रामदैवत तथा जागृत देवस्थान कामक्षा देवी मंदिर संस्थानच्यावतीने सुमारे ३५० वर्षांपूर्वीपासून परंपरेने चालत असणाऱ्या गुढीपाडवा उत्सव संपन्न होणार आहे.
किनगावराजा संस्थानातील कामक्षा देवी हे जागृत देवस्थान असून राजे लखुजीराव जाधवराव यांचे वंशांपासून सुमारे साडे तीनशे वर्ष पूर्वीपासून गुढीपाडव्याच्या दिवशी पंचक्रोशीतील प्रसिद्ध असा हिंदू देवतांच्या सोंगांचा उत्सव साजरा केला जातो. मागील काही वर्षांपासून या ठिकाणी यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पाडव्याच्या दिवशी सकाळीच कामक्षा देवीच्या मूर्तीचा विधिपूर्वक अभिषेक करून नववर्षाचे स्वागत म्हणून संपूर्ण गावभर गुढी उभारण्यात येते व महोत्सवाला प्रारंभ होतो. या दिवशी बाहेरगावाहून आलेले भक्त आपले नवस फेडण्यासाठी पेढे, साखर वाटप करीत नारळाचे तोरण घेऊन मंदिराकडे निघालेले असतात. डफड्यांच्या गजरामध्ये नवसाचे तोरण मंदिरापर्यंत घेऊन येऊन नवस फेडले जातात. मुख्य कार्यक्रमात संध्याकाळी पारंपारिक पद्धतीने भगवान श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी रानावनातून जात असल्याचा देखावा सजवलेल्या बैलगाडीतून संपूर्ण गावभर प्रदक्षिणा केली जाते. त्यानंतर कामाक्षा देवीची आरती घेतल्या जाते. जातीय सलोखा व सामाजिक एकतेचे प्रतीक असलेल्या या सणांमध्ये गावगाड्यातील अठरापगड समाजातील लोकांना ठिकठिकाणी मानाचे स्थान देऊन संपूर्ण परिसर एका सामाजिक श्रृंखलेमध्ये बांधण्याचा प्रयत्न या उत्सवातून केलेला आहे. देवीचे सोंग श्रीकामक्षा देवीच्या मंदिरासमोर आल्यानंतर मंदिर परिसरामध्ये पाच फेऱ्या मारताना दैत्याचे मर्दन केल्या जाते व त्यानंतर देवीचे सोंग ग्राम प्रदक्षिणेसाठी निघते. कार्यक्रमाच्या दरम्यान किनगाव राजा येथील प्रसिद्ध शीघ्रकवी तथा श्रीकामक्षा देवीचे निस्सीम भक्त सिद्धाराम यांनी पाडव्यासाठी गायलेल्या सिद्राण्या गायल्या जातात. देवीचे सोंग उतरल्यानंतर मंदिराच्या प्रांगणात विडंबनात्मक अशा विवाह सोहळ्याचा कार्यक्रम होतो. कार्यक्रमाचा शेवटी श्रीकामक्षा देवी संस्थानचे पारंपरिक विश्वस्थ असलेले राजेजाधव मंडळींच्या प्रमुख नियोजनाखाली पुढच्या वर्षी पाडव्याचा मान कुणाला द्यायचा याची ईश्वरचिठ्ठी काढून पुढील वर्षीचा मान जाहीर केला जातो. तसेच परंपरागत कुस्त्यांच्या फडाचे आयोजन करून विजेत्या कुस्तीगिरांचा चांदीची गदा देऊन मानसन्मान करून बक्षीस वितरित केले जातात व गुडीपाडवा उत्सवाची सांगता होते. यंदाच्या गुडीपाडवा उत्सवाचा मान सेवानिवृत्त शिक्षक शिवाजी काळुसे यांचा असून त्यांचे बंधू संजय काळुसे व प्रल्हाद काळुसे यांच्यावतीने श्रीकामक्षादेवीच्या प्रमुख सोंगाचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती श्रीकामक्षादेवी संस्थानचे विश्वस्थ राजेजाधव मंडलीकडून देण्यात आली आहे.
Users Today : 180