पाडळी शिंदे:-विशेष प्रतिनिधी
देऊळगावराजा, सिंदखेडराजा हे वनपरिक्षेत्र वनविभागाने संपन्न असुन या भागात मोर, ससा, निलगाय, हरिण, माकड यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वनविभागाच्या वेळकाढूपणामुळे रखरखत्या उन्हाळ्यात उन्हाची दाहकता वाढत असतांना वन्य प्राण्यांना घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याच्या शोधात वन्यजीव हे गावाकडे वाटचाल करत आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा बिट अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये वनविभागाच्या वतीने केवळ वन्यप्राणी यांच्यासाठी अंढेरा येथे दरवर्षी एक कृत्रिम पाणवठा सुरू करण्यात येतो. यावर्षी मार्च महिना संपत असतांना पाणवठा कार्यान्वित करण्यात आला नाही. त्यामुळे वनप्राणी हे शेतकऱ्यांनी आपल्या गुरांसाठी भरलेले हौदावर पाणी पिण्यासाठी जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी होत आहे. अगोदरच अंढेरा मंडळात यावर्षी भीषण दुष्काळ आहे. या मंडळात दरवर्षी एका कुत्रीम पाणवठ्यात नियमितपणे पाणी भरण्यात येते. मात्र, त्याकडे यंदा दुर्लक्ष झाले असून अद्यापपर्यंत तो पाणवठा कार्यान्वित करण्यात आलेला नाही. तसेच वनपरिक्षेत्र असलेले बायगाव बुद्रूक व धोत्रा नंदई हे वनपरिक्षेत्र पाणवठ्यातून आजपर्यंत दुर्लक्षित होत आले आहे. याबीटमध्ये प्राणी संख्या जास्त प्रमाणात असून वन्यप्राण्यांनी मानवी वस्त्यांमध्ये नागरिकांना त्रस्त करून सोडत आहे. याकडे वनविभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. परिणामी वन्यप्राणी शेताच्या दिशेने धाव घेत असून यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी होत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी गायकवाड यांना पाणवठ्याबाबत विचारणा करण्यासाठी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
Users Today : 180