बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
त्याग, शौर्य आणि धर्माच्या अधिष्ठानातून छत्रपती संभाजी राजे जगातील अद्वितीय महापराक्रमी योद्धा म्हणून समोर आले. स्वराज्याची पायाभरणी राष्ट्रमाता मा जिजाऊंनी, छत्रपती शिवरायांनी केली तर स्वराज्याचा भगवा ध्वज कळस म्हणून रोवण्याचे काम संभाजी राजांनी केले. असे मत ज्येष्ठ विचारवंत सखाराम अवकाळे यांनी व्यक्त केले. धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलिदान दिवस, स्मृतिदिनानिमित्त बुलढाण्यात छत्रपतींचा छावा आदर्श राजा धर्मवीर संभाजीराजे यांच्या यशोगाथेवर चर्चासत्र आणि अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन किसान ब्रिगेड, मातृतीर्थ रणरागिणी संघटना, रमाई ब्रिगेड, राणी लक्ष्मीबाई ब्रिगेड आझाद हिंद महिला संघटना, आझाद हिंद शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने 29 मार्चला सायंकाळी बुलढाण्यात करण्यात आले होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना अवकाळे यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. आयोजित चर्चासत्रात शिव व्याख्याते अॅड. सतीशचंद्र रोठे पाटील, ज्येष्ठ विचारवंत सदाशिव टेकाळे, सखाराम अवकाळे, सुभाष भागीले यांच्यासह निखिल राणे, बाबुराव शेलार, सतीश हिवरकर, पंचफुलाबाई गवळी, सुरेखा निकाळजे आदींनी प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम छत्रपती संभाजी राजांना सामूहिक करून अभिवादन करून चर्चा सत्राला सुरुवात करण्यात आली. चर्चा सत्रातील सुर.. धर्मवीर संभाजी महाराज यांचा जाज्वल रणसंग्राम आणि त्यागाची यशोगाथा येणाऱ्या पिढ्यांपर्यंत चिरंतर ठेवत राहील. एवढ्या कमी वयात एकही लढाई न हरणारा जगातील एकमेव योद्धा म्हणून महापराक्रमी संभाजी महाराजांचे नाव इतिहासात अजरामर झाले. स्वराज्य निर्मितीच्या छत्रपती शिवाजी राजे आणि राष्ट्रमाता जिजाऊंच्या सर्वोच्च ध्येयाला कृतीप्रवण करणारे महापराक्रमी धर्मवीर संभाजीराजे येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. अतुलनीय पराक्रम अद्वितीय बुद्धिमत्ता विलक्षण साहस आणि स्वराज्यासाठी सर्वस्व समर्पित करण्याची या सूत्रातून महापराक्रमी धर्मवीर संभाजी राजे जगाला आदर्श ठरले. असा एकंदरीत सूर चर्चासत्रातील सहभागी मान्यवरांच्या मनोगतामधून समोर आला. संचालन संजय एंडोले यांनी तर आभार प्रदर्शन आशाताई गायकवाड यांनी व्यक्त केले. चर्चासत्रामध्ये शहरातील शिवप्रेमी, आयोजक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
Users Today : 206