बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
शहराच्या २०४५ पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार करून तयार करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखड्याला (डीपी प्लॅन) नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मंजुरी दिली. या मंजुरीमुळे शहराच्या नियोजनबद्ध विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.बुलढाणा शहराची २०४५ पर्यंत सुमारे १ लाख लोकसंख्या गृहित धरून विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. रस्ते रुंदीकरण, जलस्रोत सुधारणा, नवीन वसाहतींसाठी भूखंड आरक्षण, उद्याने, खेळाची मैदाने यासाठी स्वतंत्र झोन निश्चित करण्यात आले आहेत. खडकपूर्णा नदीवर आधारित पाणीपुरवठा योजना, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे यांसारखे मुद्दे प्राधान्याने हाती घेण्यात आले आहेत. दोन्ही आराखडे तयार करताना नागरिकांच्या सूचना समाविष्ट करण्यात आल्या असून, अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. प्राधान्याने रस्ते, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन अशा मूलभूत सुविधांवर काम सुरू होणार आहे.नगरविकास विभाग, जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था समन्वयाने ही कामे होतील बुलढाणा पालिकेची स्थापना १८९३ मध्ये झाली होती. ब वर्ग नगरपालिकेच्या मूळ हद्दीची विकास योजना २४ जून १९७५ मध्ये मंजूर झाली होती. सुधारित विकास योजना 3 नोव्हेंबर १९९० मध्ये करण्यात आली. त्यानंतर २४ नोव्हेंबर २०१७ मध्ये ठराव घेऊन नव्या डीपी प्लॅनच्या कामास नगर रचना अधिकाऱ्यांची नियुक्ती करत २०१८ मध्ये प्रारंभ झाला होता. २ मे २०२३ मध्ये हा प्लॅन राज्य शासनास सादर करण्यात आला होता.या विकास आराखड्याच्या मंजुरीमुळे बुलढाणा शहरांच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. शहरांमध्ये अनियोजित वाढ किंवा बेसुमार बांधकामे होण्यावर नियंत्रण येणार असून शहरी वाढ नियंत्रित आणि नियोजनबद्ध राहील. यामुळे मूलभूत सुविधांचा ताण कमी होऊन प्रत्येक नागरिकाला निर्धारित सेवांचा लाभ मिळू शकेल. समतोल भौगोलिक विकासाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊस आहे. औद्योगिक विकासालाही चालना मिळेल. रहिवास क्षेत्रात मोठी वाढ बुलढाणा शहराच्या रहिवास क्षेत्रात मोठी वाढ होणार आहे. पालिकेचे एकूण क्षेत्र ११६९.५८ हेक्टर असून, त्यापैकी ८०१.२२ हेक्टर क्षेत्र विकसित क्षेत्र गृहित धरले आहे. रहिवास क्षेत्र ३१.६६ टक्क्यांवर जाणार असून पूर्वी २६६.४० हेक्टर असलेल्या क्षेत्रात १०३.९५ हेक्टरची वाढ होणार आहे. त्यामुळे शहरातील दळणवळणाचे क्षेत्रही १५.४४ टक्क्यांवर पोहोचणार आहे. तुलनेने औद्योगिक क्षेत्राचा फारसा विकास बुलढाण्यात होणार नसल्याचे चित्र दिसते. वाणिज्यिक वापराच्या जागेतही २ टक्क्यांनी वाढ होऊन हे क्षेत्र २४.२५ हेक्टरवर पोहोचेल.नागरिकांच्या सूचनाही समाविष्ट आराखडा तयार करताना नागरिकांच्या सूचना समाविष्ट करण्यात आल्या असून, अंमलबजावणी टप्प्याटप्याने करण्यात येणार आहे. प्राधान्याने रस्ते, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन अशा मूलभूत सुविधांवर काम सुरू होणार आहे. नगरविकास विभाग, जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था समन्वयाने ही कामे करण्यात येतील.
Users Today : 206