देऊळगावराजा:-तालुका प्रतिनिधी
जालना पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या संशयास्पद मृत्यूची घटना आज सकाळी (दिनांक ३० मार्च) उघडकीस आली. लॉक असलेल्या कारमध्ये या पोलिस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आला. चालकाच्या सीटवर मृतदेह असलेली ही कार देऊळगावराजा सिंदखेडराजा मार्गावरील आर. जे. इंटरनॅशनल शाळेच्या समोरील वन विभागाच्या जागेत आढळून आली. सदर घटना खून आहे की आत्महत्या आहे की याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरु आहे. सदर घटनेमुळे तालुक्यातच नव्हे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.ज्ञानेश्वर पांडुरंग म्हस्के (वय ३८) रा. गिरोली खुर्द ता. देऊळगावराजा असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून तो जालना पोलिस दलात कार्यरत आहे. हा कर्मचारी निर्व्यसनी असल्याचे बोलल्या जात असून हा कर्मचारी काल (दिनांक २९ मार्च) दिवसभर कर्तव्यावर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या संशयास्पद मृत्यूबाबत अनेक तर्कवितर्क लावल्या जात आहे. मृतदेहासह घटनास्थळावर आढळलेली MH-20-DV-3063 ही स्विफ्ट डिझायर लॉक होती. ज्ञानेश्वर म्हस्के यांचा मृतदेह चालकाच्या सीटवर होता. तर आरोपींनी मागील सीटवर बसून म्हस्के यांचा गळा आवळून खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे मात्र याबाबत पोलिसांकडून अद्यापपावेतो कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. सहाय्यक पोलिस अधिक्षक बी. बी. महामुनी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी घटनास्थळाची अत्यंत बारकाईने पाहणी केली आहे. तसेच श्वानपथक व फॉरेन्सिक तज्ञांनाही पाचारण करण्यात आलेले आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संतोष महल्ले करीत आहे.मयत ज्ञानेश्वर म्हस्के यांचा भाऊसुध्दा अंबड पोलिस दलात कार्यरत आहे. ज्ञानेश्वर म्हस्के यांना १३ वर्षाची मुलगी व ९ वर्षाचा मुलगा आहे.
Users Today : 206