बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
एकुलता एक मुलगा किडनीच्या आजाराने ग्रस्त होता. पत्नीचेही निधन झाल्याने मुलाच्या डोक्यावरील मातृछत्र हरविले होते. मुलास वाचविण्यासाठी वडिलांनी धडपड केली आणि स्वतःची किडनी देऊन प्राण वाचविले. मात्र, नियतीने डाव साधला. किडनीचे प्रत्यारोपण झाल्यानंतरही प्रकृती बिघडली आणि मुलाने जगाचा निरोप घेतला. उपचार सुरू असताना माळवंडी येथील समाधान इंगळे (४८) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वृद्धावस्थेत रामदास इंगळे यांच्या आधाराची काठी मोडली. या दुःखद प्रसंगाने माळवंडीवासीय हळहळले आहेत.तालुक्यातील माळवंडी येथील रहिवासी रामदास तुळशीराम इंगळे यांना समाधान हा एकुलता एक मुलगा होता. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. पुत्र समाधान यांना वडिलांनी कष्ट उपसून शिक्षण दिले. बीई केमिकल इंजिनीअरिंगपर्यंत उच्चशिक्षित झालेले समाधान इंगळे यांनी मुंबई, छत्रपती संभाजीनगर येथे नोकरी केली. वडिलांची सेवा करता यावी याकरिता त्यांनी ती नोकरी सोडली आणि बुलढाणा येथे फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय सुरू केला.दरम्यान, आठ महिन्यांपूर्वी किडनी निकामी झाल्याने समाधान इंगळे खचून गेले. मुलगा कोणत्याही परिस्थितीत आयुष्यमान व्हावा, यासाठी वयोवृद्ध वडिलांनी स्वतःची किडनी दान करत जगासमोर आदर्श निर्माण केला. मात्र, हे नियतीला मान्य झाले नाही. काही दिवसांतच समाधान इंगळे यांची प्रकृती बिघडली. ३१ मार्च रोजी पहाटे साडेबाराच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. गावी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Users Today : 206