मलकापूर:-तालुका प्रतिनिधी
नऊवारी साडी,नथ, दागिने आणि गॉगल घातलेल्या तरुणींनी बाईकला किक मारली अन् अवघी मलकापूर नगरी जागी झाली. जिगरबाज नारींची बाईक रॅली शहरातील मुख्य रस्त्यावरून चालली आणि ही नव्या युगाची नारीशक्ती बघून मलकापूर नगरी अभिमानाने भारावून गेली. परंपरेचे सौंदर्य आणि नव्या जमान्याच्या धैर्याचे विराट दर्शन या रॅलीमुळे मलकापूरला झाले. तर गुढीपाडवा नववर्षाच्या मुहूर्तावर नववर्षाचे स्वागत करण्याकरिता या बाईक रॅलीने आम्हाला नव्याने आत्मविश्वास दिल्याची भावना बाईकस्वार नारींनी व्यक्त केली.महिला सक्षमीकरणाचा संदेश आणि नारीशक्तीचा जागर करत रविवारी मलकापुरातील जिगरबाज महिला थेट बाईकवर स्वार होऊन रस्त्यावर उतरल्या होत्या. श्रीराम ढोल पथकच्या वतीने खास गुढीपाडव्यानिमित्त आणि मराठी नववर्षानिमित्त मलकापूर नगरीत महिलांसाठी आयोजित केलेल्या भव्य बाईक रॅलीचा प्रारंभ भगवा ध्वज फडकवून लि. भो. चांडक विद्यालयाच्या भव्य प्रांगणातून करण्यात आला. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आमदार चैनसुख संचेती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगरसंघचालक दामोदर लखानी, उद्योजक प्रसन्न देशपांडे, माजी नगरसेवक शंकरराव पाटील, अमृत बोंबटकार, सचिन चव्हाण, यशभैय्या संचेती, आशिष माहुरकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत निघालेल्या जल्लोषी रॅलीत पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या, नऊवारी साड्या नेसलेल्या, दागिन्यांनी सजलेल्या आणि गॉगल घातलेल्या असंख्य महिला मुली रविवारी सकाळी बाईक घेऊन रस्त्यावर उतरल्या. बाईकवर स्वार झालेल्या या महिलांचे शानदार स्वागत करण्यात आले. या साऱ्या महिलांना मानाचा फेटा बांधण्यात आला आणि सारा माहौल बदलून गेला. उत्साह, उत्कंठतेसोबत आता आत्मविश्वास आणि जल्लोषही संचारला.
Users Today : 206