चिखली:-तालुका प्रतिनिधी
गुरुदेव आश्रमाच्या ३३ व्या वर्धापन दिनाचा समारोप काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने उत्साहात झाला. या प्रसंगी प. पू. श्रीहरि चैतन्यनंद सरस्वती स्वामी महाराज यांनी भक्तांना मार्गदर्शन केले. गरिबांमुळेच श्रीमंतांना महत्त्व प्राप्त होते. जर सर्वच श्रीमंत असते, तर कोणालाच किंमत राहिली नसती. समाजात गरीब आहेत म्हणूनच श्रीमंतांना प्रतिष्ठा मिळते. ईश्वराने प्रत्येकाला वेगवेगळे गुण दिले आहेत. कोणाकडे माणुसकी आहे, तर कोणाकडे पैसा. त्यामुळे समाजात संतुलन राखले जाते असल्याचे प्रतिपादन स्वामीजी यांनी केले.या समारंभाला जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी आ. धृदपतराव सावळे, केंद्रीयमंत्री ना. प्रतापराव जाधव, मुख्यमंत्री फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले, आ. श्वेताताई महाले, आ. सिद्धार्थ खरात, आ. मनोज कायंदे, माजी जि. प. अध्यक्ष नरेंद्र खेडेकर, माजी आ. राहुल बोंद्रे, माजी आ. विजयराज शिंदे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष नंदू कऱ्हाडे, अॅड. शर्वरी रविकांत तुपकर, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे, चंद्रकांत बर्दे, बीडीओ गजानन पोफळे, माजी नगराध्यक्ष सुरेश खबुतरे, अंबिका अर्बनचे अध्यक्ष विजय कोठारी, कुणाल बोंद्रे, राम डहाके, श्रद्धाताई महाले आदी मान्यवर उपस्थित होते.स्वामीजींनी पुढे म्हणाले की, जे आई-वडिलांची मनोभावे सेवा करतात, त्यांच्या जीवनात कधीच अडचणी येत नाहीत. आई-वडिलांचे उपकार कधीही विसरू नयेत, धार्मिक ग्रंथ वाचण्यापेक्षा चांगल्या लोकांची संगत धरा आणि व्यसनांपासून दूर राहा, संत तुकाराम महाराज हे केवळ संत नव्हते, तर ते एक महापुरुष होते. प्रत्येक व्यक्तीचे मन एकच असले, तरी विचार मात्र भिन्न असतात.सर्व मानवांचे रक्त लाल आहे, मग जातीचा प्रश्न येतोच कुठे ? प्रत्येकाने आपल्या स्वार्थासाठी जाती निर्माण केल्या आहेत. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन या सर्वांचे रक्त आणि अवयव सारखेच आहेत, मग जातीभेद कशासाठी? जात फक्त स्त्री आणि पुरुष हीच आहे, परंतु स्वार्थी लोकांनी इतर जाती निर्माण केल्याचे सांगितले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. गणेश कोल्हे यांनी केले.
Users Today : 213