भांडण सोडविल्याच्या रागातून पेंटरला गच्चीवरून फेकले

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी 

प्लॉटच्या कारणावरून झालेले भांडण सोडविल्याच्या क्षुल्लक वादातून दोघांनी शेजारी राहणाऱ्या पेंटरला गच्चीवरून फेकले. २४ मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. यात गंभीर जखमी झालेल्या पेंटरवर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, शहर पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध अॅट्रॉसिटी अॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.प्रशांत रमेश बोर्डे (२९) असे गंभीर जखमी झालेल्या पेंटरचे नाव आहे. इंदिरानगरमध्ये राहणाऱ्या बोर्डे यांच्या शेजारीच आरोपी अमजद बागवान व शफीक बागवान राहतात. या भागातील सदस्य समीर खान व अमजद बागवान आणि शबाना बागवान यांच्यात भूखंडाच्या कारणावरून भांडण झाले होते. भांडण सोडविण्यासाठी प्रशांत बोर्डेनी मध्यस्थी केली. तेव्हापासून शबाना बागवान, अमजद बागवान, शफीक बागवान मनात राग धरून होते. येता, जाता अर्वाच्च व जातिवाचक शिवीगाळ करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, असा त्रास आरोपी देत होते.दरम्यान, २४ मार्च रोजी रात्री दहा वाजता प्रशांत बोर्डे जेवण करून घराच्या स्लॅबवर झोपण्यासाठी गेले होते. लहान भाऊ घरात झोपला होता, तर आई रुग्णालयात नाइट ड्युटीसाठी गेली होती. घराच्या बाहेरील जिन्यावरून रात्री अकरा वाजता अमजद बागवान व शफीक बागवान आले आणि त्यांनी वाद घातला. दोघांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने बोर्डे यांना गच्चीवरून जमिनीवर फेकले. त्यामुळे ते बेशुद्ध झाले.जमिनीवर कोसळल्याने पाठीचा मणका व कंबरेमध्ये फॅक्चर झाले. तसेच दोन्ही पाय कंबरेपासून निकामी झाले. गंभीर जखमी प्रशांत बोर्डे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.शहर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध बीएनएस कलम १०९, ११८ (२), ११५ (२), ३५१ (२), ३५१ (३), ३५२ (५) तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील करीत आहेत.

0 9 5 4 8 7
Users Today : 213
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *