४ हजार हेक्टर पिकांना अवकाळी तडाखा

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी 

नववर्षाचे तीन महिने सुखाचे गेल्यानंतर निसर्गाने चौथ्या एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आपल्या अवकाळी घेऱ्यात ओढले आहे. २ एप्रिलच्या रात्री जिल्ह्याच्या आठ तालुक्यांना वादळी पावसाने झोडपून काढल्याने पिकांची मोठी हानी झाली. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. बुलढाणा, चिखली, मोताळा, मलकापूर, खामगाव, नांदुरा, जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यामधील १६६ गावांना आपत्तीची बाधा पोहोचली. यामध्ये ४ हजार १८२.५० हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिके, भाजीपाला आणि फळपिकांची प्रचंड हानी झाली आहे. रब्बी ज्वारी, मका, कांदा, बीजवाई कांदा, भाजीपाला, आंबा, पपई, केळी, संत्रा, लिंबू, भुईमूग अशा पिकांची पूर्णतः नासाडी झाली. नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. बुलढाणा व चिखली तालुक्यात वादळीवाऱ्यासह गारपीट झाली. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात अवकाळी पावसाने बुधवारी रात्री अकरा वाजेनंतर शेतकऱ्यांसह नागरिकांची झोप उडविली. अनेक गावांमध्ये वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाला.बुलढाणा तालुक्यात १४ गावांमध्ये ८३.५० हेक्टर पिकांना बाधा झाली. चिखलीमध्ये दोन गावात १२ हेक्टरवरील मका, कांदा, पपईला फटका बसला. मोताळा तालुक्यात ९ गावांमध्ये ७०२ हेक्टर मका, कांदा, ज्वारीचे नुकसान झाले, मलकापूर तालुक्यात १२ गावात ९० हेक्टरवरील रब्बी मका पिकाचे नुकसान झाले.खामगाव तालुक्यातील ४२ गावांनाही आस्मानी फटका बसला. ९५४ हेक्टर क्षेत्रावरील मका, ज्वारी, गहू, कांदा, केळी, संत्रा, लिंबू, भुईमूग, फळपिकांची हानी झाली आहे. नांदुरा तालुक्यात ४९ गावे वादळी तडाख्यात सापडली. १ हजार ६५५ हेक्टरवरील मका, ज्वारी, कांदा, गहू पपई, केळीचे नुकसान झाले. जळगाव जामोदमधील १० गावांमध्ये ८७ हेक्टरवरील मका, गहू, ज्वारीचे नुकसान झाले, तसेच संग्रामपूर तालुक्यात २८ गावांमधील ५९९ हेक्टरवरील गहू, मका, कांदा, ज्वारी, भाजीपाल्याचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. नांदुऱ्यात सर्वाधिक हानी या अवकाळीचा सवांधिक फटका नांदुरा तालुक्याला बसला आहे. १ हजार ६५५ हेक्टरवरील पिके बाधित झाली. त्या खालोखाल खामगाव ९५४ हेक्टर, मोताळा ७०२ हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली आहे. कैऱ्यांचा सडा यंदा आंब्याचे पीक जोमात आले आहे. मात्र, वादव्वच्या तडाख्यात सापडून कैऱ्यांचा सडा आंब्याच्या झाडाखाली पडला आहे. यामुळे यंदाची रसभरीत रसाळीची सरबराई करण्याला मुकावे लागण्याची चिन्हे आहेत.

0 9 5 4 8 7
Users Today : 213
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *