दुसरबीड:-विशेष प्रतिनिधी
नागपूरहून मुंबईकडे जात असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने कार साइड बेरिअरला धडकून अपघात घडला. यात एकजण किरकोळ जखमी झाला. मात्र, दुसऱ्या अपघातात एक चालक ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. चोवीस तासांच्या आत या घटना घडल्या.सूरत येथील जितेंद्र कुमार पटेल (७०) हे ३ एप्रिलला जीजे-२१-सीई-४२८८ क्रमांकाच्या कारने नागपूरहून मुंबईकडे निघाले होते. मुंबई कॉरिडोर चॅनेल नंबर २९७ वर सकाळी पावणेअकराच्या सुमारास कारवरील नियंत्रण सुटून वाहन साइड बॅरियरला जाऊन धडकले. या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र कारचे मोठे नुकसान झाले.दुसरा अपघात ४ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता चॅनल नंबर ३१८.८ वर नागपूर कॉरिडोरवर घडला. शिर्डी येथून अमरावतीकडे चिकू घेऊन जाणारे एमएच ३०-बीडी-५५७२ क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने समोरील वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात मालवाहू वाहनचालक धनंजय गजानन तायडे (२५, रा. बार्शी टाकळी) हा ठार झाला. तसेच प्रथमेश हिंमतराव लाहोळकर याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती समजताच क्यूआरव्ही टीम, एमएसएफ जवान, रुग्णवाहिका कर्मचारी व महामार्ग पोलीस मदत केंद्राचे निरीक्षक गजानन उज्जैनकर, पोहेकॉ रोशन शेख, पोलीस शिपाई संदीप किरके, भुतेकर यांनी अपघातग्रस्त व्यक्तींना मदत केली. तसेच अपघातग्रस्त वाहन रोडच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास किनगाव राजा पोलीस करीत आहेत.हे दोन्ही अपघात दुसरबीड टोल नाक्यापासून पूर्व पश्चिम दिशेला पाचशे मीटर अंतराच्या आत झाले. विशेष म्हणजे सदरचे कन्स्ट्रक्शन केलेल्या तढेगाव बेस कॅम्पच्या एक किमी अंतरावर आहे. टोल नाका परिसरात समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून अपघाताची संख्या वाढतच आहे. परंतु रोडवेज सोल्यूशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड पुणे, बेस कॅम्प तढेगाव यांनी तसेच बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी यावर कोणतेही संशोधन केले नसल्याची ओरड वाहनधारक व परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
Users Today : 213